Crime News : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील छौली गावात मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. सुमारे महिन्याभरापूर्वी घडलेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. प्रियकराशी मोबाईलवर बोलण्यात अडथळा ठरत असल्याने आईनेच आपल्या मुलाला गळा आवळून संपवल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली आहे.
आजारपणाचा बनाव अन् अंत्यसंस्कार
तक्रारदार कृष्ण मुरारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जूनच्या संध्याकाळी त्यांची पत्नी रुची हिने फोन करून 3 वर्षांचा मुलगा माधव अचानक शांत झाला असून तो जागा होत नसल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी त्याला तातडीने मथुरेतील खाजगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यावेळी कोणताही संशय न आल्याने कुटुंबीयांनी मुलावर अंत्यसंस्कार केले.
फोनवरील संभाषणातून कट उघड
काही दिवसांनंतर पती कृष्ण मुरारी यांनी पत्नीला एका अज्ञात तरुणाशी फोनवर बोलताना ऐकले, ज्यामध्ये ते मुलाच्या मृत्यूविषयी चर्चा करत होते. पतीने धाक दाखवून विचारपूस केली असता, रुचीने आपल्या अनैतिक संबंधांची कबुली दिली. प्रियकराशी फोनवर बोलत असताना मुलगा सतत गोंधळ घालत होता, त्यामुळे आलेल्या रागाच्या भरात तिने मुलाचा गळा दाबला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. या संपूर्ण प्रकाराची कल्पना तिच्या प्रियकरालाही होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलीस तपास अन् पुढील कारवाई
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आई रुची गुप्ता आणि तिच्या कथित प्रियकराविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सध्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) आणि इतर तांत्रिक पुराव्यांची छाननी करत आहेत. महावनचे सर्कल ऑफिसर संजीव कुमार राय आणि स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) अभय कुमार शर्मा यांनी सांगितले की, सर्व बाजूंनी आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष तपास सुरू असून, दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.