Marathi Cinema Controversies 2025: सरत आलेले 2025 हे वर्ष मराठी मनोरंजन विश्वासाठी केवळ मनोरंजनाचेच राहिले नाही, तर हे वर्ष वादांच्या मालिकांमुळेही स्मरणात राहील. महापुरुषांबद्दलची विधाने असोत किंवा कलाकारांचे खासगी चॅट्स, या वर्षी मराठी सिनेइंडस्ट्रीत अनेकवेळा 'हाय व्होल्टेज' ड्रामा पाहायला मिळाला.
राहुल सोलापूरकर यांचे विधान आणि संतापाची लाट
वर्षाच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले. एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या टिप्पणीचे तीव्र पडसाद उमटले. केवळ चित्रपटसृष्टीतूनच नव्हे, तर राजकीय आणि सामाजिक स्तरावरूनही त्यांच्यावर कडाडून टीका झाली, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
'छावा' सिनेमा, प्रमोशन आणि अंतर्गत वाद
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील 'छावा' चित्रपट फेब्रुवारीत प्रदर्शित झाला. चित्रपटात मराठी कलाकारांची मोठी फळी होती, पण पडद्यामागचे वाद चर्चेत राहिले. संतोष जुवेकरने एका मुलाखतीत अक्षय खन्नाबद्दल केलेले विधान आणि आस्ताद काळेची सोशल मीडियावरील नकारात्मक पोस्ट, यामुळे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला.
'खालिद का शिवाजी'; इतिहासाच्या विकृतीकरणाचा आरोप
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज प्रीतम मोरे यांचा 'खालिद का शिवाजी' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात अडकला. इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत विविध संघटनांनी या चित्रपटाला तीव्र विरोध केला. याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळापर्यंत उमटल्याने हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर गाजले.
'मनाचे श्लोक'चे शीर्षक बदलण्याची नामुष्की
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' या चित्रपटाच्या नावावर समर्थ रामदास स्वामींच्या अनुयायांनी आक्षेप घेतला. व्यावसायिक कारणासाठी या पवित्र नावाचा वापर केल्याने पुण्यात चित्रपटाचे प्रयोग बंद पाडण्यात आले. अखेर वाढता विरोध पाहून निर्मात्यांना चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला.
सुदेश म्हशीलकर आणि प्राची पिसाट यांचे 'चॅट वॉर'
वर्षातील सर्वात धक्कादायक प्रकरण म्हणजे अभिनेत्री प्राची पिसाटने अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्यावर केलेले आरोप. प्राचीने सुदेश यांच्यासोबतचे व्हॉट्सॲप चॅट स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल केले. या अश्लील मेसेजेसमुळे इंडस्ट्रीत खळबळ उडाली आणि कलाकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
प्राजक्ता माळीचा कार्यक्रम रद्द
दरम्यान, गेल्या वर्षाच्या वादाची छटा प्राजक्ता माळीच्या बाबतीत 2025 मध्येही कायम होती. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे तिचा 'शिवार्पणमस्तु' हा नृत्याचा कार्यक्रम नियोजित होता. मात्र, तिच्या जुन्या राजकीय विधानांमुळे झालेल्या तीव्र विरोधानंतर देवस्थान ट्रस्टला हा कार्यक्रम रद्द करावा लागला.