Gold Mine Collapse: सोन्याची खाण खचून 60 कामगारांचा करुण अंत; अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

या घटनेनंतर परिसरात एकच हाहाकार उडाला असून, अद्यापही अनेक कामगार बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Gold Mine Collapse: सोन्याची खाण खचून 60 कामगारांचा करुण अंत; अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

Gold Mine Collapse: उत्तर-पूर्व आफ्रिकेतील सुदान या देशात एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. वेस्ट कॉर्डोफोन प्रांतातील अल-नुहूद शहराच्या उत्तर भागात असणारी सोन्याची खाण अचानक कोसळल्याने किमान 60 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मजूर खाणीच्या आत सोन्याचे उत्खनन करत असतानाच माती आणि दगडांचा मोठा ढिगारा त्यांच्यावर कोसळला. या घटनेनंतर परिसरात एकच हाहाकार उडाला असून, अद्यापही अनेक कामगार बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी बचावकार्य सुरू केले असले तरी ढिगारा मोठा असल्याने अडचणी निर्माण होत आहेत.

सुरक्षा नियमांचा अभाव अन् धोकादायक पारंपरिक पद्धती ठरतायत जीवघेण्या

सुदान हा आफ्रिका खंडातील सोन्याचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक मानला जातो, मात्र येथील खाणकाम सुरक्षा मानकांच्या अभावामुळे अत्यंत धोकादायक बनले आहे. या भागातील बहुतांश खाणींमध्ये सुरक्षिततेची कोणतीही आधुनिक यंत्रणा किंवा उपकरणे उपलब्ध नसतात. अत्यंत असुरक्षित आणि पारंपरिक पद्धतीने जमिनीत खोल खोदकाम करून सोने बाहेर काढले जाते. या अवैध उत्खननातून मिळणाऱ्या सोन्याची मोठी तस्करीही केली जाते. वेस्ट कॉर्डोफोनमधील अनेक खाणींवर स्थानिक अर्धसैनिक दल 'रॅपिड सपोर्ट फोर्सेस'चे (RSF) वर्चस्व आहे. आर्थिक फायद्यासाठी मजुरांच्या प्राणांची पर्वा न करता येथे असुरक्षितपणे काम चालवले जात असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – India Pakistan Naval Collision: अरबी समुद्रात भारत अन् पाकिस्तानच्या युद्धनौकांची धडक; भारताकडून पाकिस्तानी उच्चायुक्तांना समन्स

खाण अपघातांची मालिका सुरूच 

सुदानमध्ये अशा प्रकारच्या जीवघेण्या दुर्घटना वारंवार घडताना दिसत आहेत. यापूर्वी जुलै 2026 मध्ये उत्तर सुदानमधील वादी हाफा भागात खाण खचून 15 मजुरांना आपला जीव गमवावा लागला होता, तर एप्रिल 2026 मध्ये घडलेल्या अशाच एका घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे सुदानमधील खाण कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. इतकी मोठी जीवितहानी होऊनही सुदान सरकारकडून मृत कामगारांच्या नातेवाईकांसाठी नुकसानभरपाई अथवा भविष्यात अशा दुर्घटना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number