ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉन्डी बीच (Bondi Beach) येथे ज्यू धर्मीयांचा हनुक्का (Hanukkah) सण सुरू असताना झालेल्या भीषण गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जग हादरले आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सुमारे 6:30 वाजता हजारो नागरिक समुद्रकिनारी धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र जमले असताना अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू झाला. या दहशतवादी हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑस्ट्रेलियन प्रशासनाने या घटनेला अधिकृतपणे दहशतवादी हल्ला घोषित केले आहे. घटनेनंतर तातडीने पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन गोळीबार करणाऱ्यांपैकी एकाला घटनास्थळीच ठार करण्यात आले, तर दुसरा गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. या हल्ल्यामागे आणखी कोणी सहभागी होते का, किंवा इतर कोणते जाळे कार्यरत होते का, याचाही सखोल तपास सुरू आहे. या हल्ल्यानंतर भारत, अमेरिका, फ्रान्स, इटलीसह अनेक देशांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. जगभरातून ऑस्ट्रेलियाशी एकजूट दर्शवण्यात येत असून पीडित कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन समोर आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: Sydney Mass Shooting: ऑस्ट्रेलियातील सिडनीत भीषण दहशतवादी हल्ला, अंधाधुंद गोळीबार; 10 ठार
सिडनीतील एका वरिष्ठ कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारातील संशयितांपैकी एकाची ओळख नवीद अकरम (Naveed Akram) अशी झाली आहे. तो मूळचा पाकिस्तानातील लाहोर (Lahore) येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर नवीद अकरमचे फोटो व्हायरल झाल्यानंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, नवीद अकरमने यापूर्वी इस्लामाबादमधील एका विद्यापीठात शिक्षण घेतले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियात आल्यानंतर त्याने सिडनीतील अल-मुराद इन्स्टिट्यूट (Al-Murad Institute) येथेही शिक्षण घेतल्याचे समोर आले आहे.
ऑनलाइन समोर आलेल्या एका ओळखपत्राच्या फोटोमध्ये तो पाकिस्तान क्रिकेट संघाची जर्सी परिधान केलेला दिसत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवा आणि चर्चांवर प्रतिक्रिया देताना न्यू साउथ वेल्स (New South Wales, NSW) पोलिस आयुक्त मल लॅन्यन (Mal Lanyon) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी स्पष्ट केले की, हा बदला घेण्याचा काळ नसून पोलिसांना त्यांचे काम करू देण्याची ही वेळ आहे. संशयितांपैकी एका व्यक्तीबाबत सध्या मर्यादित माहिती उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
या हल्ल्यानंतर इस्रायलमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी ऑस्ट्रेलियात वाढत असलेल्या यहूदी-विरोधी भावनांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज (Anthony Albanese) यांनी या गोळीबाराला दहशतवादी हल्ला ठरवत कडक शब्दांत निषेध व्यक्त केला असून, पीडित कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.