प्रशांत महासागरात घडामोडी झपाट्याने बदलत असून जग पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. तैवानच्या मुद्द्यावरून आधीच चीन आणि जपानमध्ये तणाव शिगेला पोहोचलेला असताना, आता या संघर्षात महाशक्ती थेट मैदानात उतरल्याने जागतिक राजकारण हादरले आहे. चीनच्या बाजूने रशियाने ताकद दाखवल्यानंतर, अमेरिकेनेही थेट आणि आक्रमक पाऊल उचलत परिस्थिती आणखी गंभीर केली आहे. जपानच्या समर्थनार्थ अमेरिकेने आपले सर्वात घातक मानले जाणारे बी-2 स्टेल्थ बॉम्बर आता पूर्व चिनी समुद्रात तैनात केले आहे.
अमेरिकेचे बी-2 बॉम्बर जपानच्या एफ-35 आणि एफ-15 या अत्याधुनिक लढाऊ विमानांसह एकूण 10 फायटर जेट्ससोबत पेट्रोलिंग करत असल्याचे समोर आले आहे. या हालचालींचा व्हिडिओही प्रसिद्ध झाला असून, त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडवली आहे. ही केवळ सरावाची बाब नसून, थेट शक्तिप्रदर्शन असल्याचे मानले जात आहे. या आठवड्यात चीनने रशियाच्या वायुदलासोबत संयुक्त एअर पेट्रोलिंग केले होते. रशियाचे टीयू-95 स्ट्रॅटेजिक मिसाइल वाहक बॉम्बर आणि चीनचे एच-6 बॉम्बर्स यांनी ईस्ट चायना सी, जपानचा समुद्र आणि पश्चिम प्रशांत महासागरात एकत्र पाहणी केली. चीन-जपान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत संवेदनशील मानली गेली होती.
त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता अमेरिकेने थेट बी-2 बॉम्बर जपानच्या मदतीसाठी पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर रशियाने आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केल्याचा दावा केला असला, तरी जपान आणि दक्षिण कोरियाने रशियाच्या या भूमिकेला तीव्र विरोध दर्शवला आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सुरू असलेली ही लष्करी हालचाल केवळ दोन-तीन देशांपुरती मर्यादित न राहता जागतिक सुरक्षेसाठी मोठा इशारा ठरत आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला थरकाप उडवणारा इशारा दिला होता. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबले नाही, तर जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. युक्रेन-रशिया युद्धाला थेट किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व देशांसाठी हा इशारा असल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले होते.
आता ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतरच अमेरिकेने बी-2 बॉम्बर थेट जपानच्या बाजूने मैदानात उतरवल्याने, हा केवळ संदेश नाही तर संभाव्य महासंघर्षाची नांदी असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशांत महासागरातील हा वाढता तणाव जगाला कुठल्या दिशेने घेऊन जाणार, हा प्रश्न आता सर्वांच्या मनात घर करून आहे.