Human Trafficking: फेसबुकवरील एका जाहिरातीने उद्ध्वस्त केली आयुष्यं! थायलंडहून म्यानमारमध्ये कैद; महाराष्ट्रातील 25 तरुणांच्या सुटकेसाठी सरकारची धावपळ

थायलंड–म्यानमार सीमेजवळ अडकलेल्या महाराष्ट्रातील युवकांच्या सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय झाले आहे.

Human Trafficking: फेसबुकवरील एका जाहिरातीने उद्ध्वस्त केली आयुष्यं! थायलंडहून म्यानमारमध्ये कैद; महाराष्ट्रातील 25 तरुणांच्या सुटकेसाठी सरकारची धावपळ

थायलंड-म्यानमार सीमावर्ती भागात रोजगाराच्या आमिषाने नेऊन अडकविण्यात आलेल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या सुटकेसाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. या गंभीर प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने समन्वय साधून कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर विशेषतः फेसबुकवर आकर्षक नोकरीच्या जाहिराती दाखवून काही तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष देण्यात आले. या आमिषाला बळी पडून काही युवक थायलंडला गेले. मात्र तिथून त्यांना म्यानमार सीमावर्ती भागात नेऊन बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या ठिकाणी या तरुणांकडून जबरदस्तीने ऑनलाइन फसवणुकीचे काम करून घेतले जात असल्याची माहिती आहे. दररोज 16 ते 18 तास काम करण्यास भाग पाडले जात असून, काम करण्यास नकार दिल्यास त्यांना मारहाण, मानसिक छळ तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला कळवले आहे.

हेही वाचा: Accident News: दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर अग्नितांडव! 8 जणांचा होरपळून मृत्यू; आग कशामुळे भडकली? डिकीत सापडलेल्या 'त्या' वस्तूने खळबळ

या प्रकरणात महाराष्ट्रातील 25 हून अधिक युवक अडकल्याची प्राथमिक माहिती आहे, तर देशभरातील एकूण 400 हून अधिक तरुण या जाळ्यात अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे परदेशातील नोकरीच्या नावाखाली चालणाऱ्या रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी नाशिकमधील अडकलेल्या काही तरुणांशी थेट संवाद साधून त्यांना धीर दिला आणि शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, मंत्री महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रशासनाला तातडीने समन्वय साधण्याचे आणि आवश्यक सर्व उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास बँकॉक आणि संबंधित आंतरराष्ट्रीय यंत्रणांशी समन्वय साधून अडकलेल्या तरुणांची सुरक्षित सुटका करण्यासाठी वेगवान कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र व राज्य सरकार एकत्रितपणे या प्रकरणात सक्रिय असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: Human Trafficking : फेसबुकवरील जाहिरात पडली महागात; 70 हजारांच्या मोहापायी महाराष्ट्राचे तरुण परदेशात कैद; मदतीसाठी धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे धाव

मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, राज्य सरकार या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहे. प्रत्येक अडकलेल्या तरुणाला सुरक्षित परत आणण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. त्यांनी कुटुंबीयांना घाबरून न जाता शासनावर विश्वास ठेवण्याचे आवाहनही केले आहे.

या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना विशेषतः युवकांना परदेशात नोकरी स्वीकारताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावरील जाहिराती, अनोळखी एजंट आणि संशयास्पद कंपन्यांवर आंधळा विश्वास न ठेवता सर्व कागदपत्रांची आणि रोजगार प्रक्रियेची योग्य पडताळणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number