NASA Orion Mission Space Toilet Leak : चंद्राची यशस्वी प्रदक्षिणा पूर्ण करून पृथ्वीकडे झेपावणाऱ्या ‘ओरियन’ स्पेसक्राफ्टमध्ये सध्या एक विचित्र आणि तितकीच गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या यानातील सुमारे 23 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 192 कोटी रुपये) किमतीची अत्याधुनिक टॉयलेट सिस्टीम अचानक जाम झाली आहे. विशेषतः लघवी (यूरिन) बाहेर काढणारी यंत्रणा बंद पडल्याने यातील 4 अंतराळवीरांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पृथ्वीवर पोहोचण्यासाठी अद्याप 24 तासांचा कालावधी शिल्लक असताना ही समस्या उद्भवल्याने अंतराळवीरांची धाकधूक वाढली आहे. इकडे नासाच्या शास्त्रज्ञांचीही झोप उडाली आहे.
केमिकल रिॲक्शन ठरली कारणीभूत?
सुरुवातीला नासाला वाटले होते की फिल्टरमध्ये बर्फ साचल्यामुळे ही अडचण आली असावी. (अंतराळातील तापमान खूप कमी असते) म्हणून स्पेसक्राफ्टची दिशा सूर्याकडे वळवून हीटर्स सुरू करण्यात आले. मात्र, तपासात असे समोर आले की ही समस्या बर्फाची नसून केमिकल रिॲक्शनची आहे. यूरिनमधील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या प्रक्रियेतून निर्माण झालेला कचरा फिल्टरमध्ये अडकल्याने ही यंत्रणा ठप्प झाली आहे. अंतराळवीर क्रिस्टीना कोच यांनी स्वतः या सिस्टीमचे कंट्रोल्स ॲडजस्ट करून दुरुस्तीचा प्रयत्न केला. यामुळे त्यांनी गमतीने स्वतःला ‘स्पेस प्लंबर’ असे संबोधले आहे.
बॅकअप कंटेनर्सचा वापर आणि वाढती दुर्गंधी
यूरिन डिस्पोजल सिस्टीममधून हीटरला आग लागल्यासारखा उग्र वास येत असल्याची तक्रार अंतराळवीरांनी केली आहे. जरी विष्ठा काढण्याची व्यवस्था व्यवस्थित सुरू असली, तरी वेस्टवॉटर टँक रिकामा होत नसल्याने अंतराळवीरांना आता ‘कोलेप्सिबल कंटिंजेंसी यूरिन डिस्पोजल डिवाइसेस’ या विशेष बॅकअप कंटेनर्सचा वापर करावा लागत आहे. या समस्येमुळे 1970 मधील अपोलो 13 मिशनमधील “ह्यूस्टन, वी हॅव अ प्रॉब्लेम” या ऐतिहासिक वाक्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे.
Houston, we have a problem … with the toilet. After a successful trip around the Moon, everything has been going smoothly on the Orion spacecraft’s journey back to Earth – except for the $23 million toilet, which is cloggedhttps://t.co/kQqAs54IvY pic.twitter.com/wfIG5M4sil — AFP News Agency (@AFP) April 9, 2026
ओरियनमधील टॉयलेटचे वैशिष्ट्य
ओरियनमधील हे टॉयलेट इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) सारखेच असल्याचे नासाने म्हटले आहे. तरीही डीप स्पेस मिशनमध्ये त्याचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. केवळ 5 मीटर रुंद आणि 3 मीटर उंच असलेल्या या यानात टॉयलेट फ्लोअरच्या खाली आहे, जिथे अंतराळवीरांना थोडा एकांत मिळतो. माइक्रोग्रॅविटीमध्ये काम करण्यासाठी येथे सक्शन सिस्टीम वापरली जाते आणि घन कचरा बॅगमध्ये साठवून तो पुन्हा पृथ्वीवर आणला जाणार आहे. अपोलो मिशनमध्ये अंतराळवीरांना अशा टॉयलेटची सुविधा नव्हती, त्यांना फक्त बॅग्स वापरावा लागत असे.
शुक्रवारी होणार स्प्लॅशडाउन
नासाच्या एसोसिएट एडमिनिस्ट्रेटर लोरी ग्लेज यांनी सांगितले की, शुक्रवारी हे यान प्रशांत महासागरात उतरल्यानंतर (Splashdown) तज्ज्ञांची टीम या बिघाडाचे नेमके कारण शोधण्यासाठी यानात प्रवेश करेल. अंतराळ मोहिमा किती क्लिष्ट असू शकतात, हे या 192 कोटींच्या टॉयलेट बिघाडावरून स्पष्ट होत आहे. एकीकडे चंद्राची सफर यशस्वी झाली असली तरी, या शेवटच्या काही तासांतील तांत्रिक अडचणीने अंतराळवीरांची मोठी कसोटी घेतली आहे.