Air India Israel flights suspended: पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि सुरक्षाविषयक अनिश्चितता लक्षात घेता, एअर इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने गुरुवारी जाहीर केले की, तेल अवीव-दिल्ली मार्गावरील आपली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आता थेट जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत स्थगित राहील. यापूर्वी विमान कंपनीने जूनच्या अखेरपर्यंत ही सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र, या प्रदेशातील भू-राजकीय परिस्थितीमध्ये कोणताही सकारात्मक बदल न झाल्याने आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम असल्याने, या प्रमुख भारतीय विमान कंपनीने सेवा स्थगितीचा कालावधी आणखी एका महिन्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
भू-राजकीय परिस्थितीमुळे घेतला निर्णय
विमान कंपनीच्या इस्रायलमधील कामकाजाचे नेतृत्व करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'पीटीआय' (PTI) या वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, "विमान वेळापत्रकातील बदलांबाबतची अधिकृत सूचना जारी करण्यात आली असून, सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे ही विमानसेवा 31 जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली आहे." फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू झालेल्या या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. इंधनाच्या वाढत्या किमती आणि हवाई क्षेत्रावरील निर्बंध यांमुळे विमान कंपन्यांचा ऑपरेशनल खर्च प्रचंड वाढला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी काही काळासाठी टिकून राहिली असली, तरीही या भागातील अनिश्चिततेमुळे बहुतांश जागतिक विमान कंपन्यांनी तेल अवीवसाठीची उड्डाणे थांबवणेच पसंत केले आहे.
इस्रायलमधील 40,000 हून अधिक भारतीयांची चिंता वाढली
एअर इंडियाच्या या निर्णयामुळे इस्रायलमध्ये वास्तव्यास असलेल्या 40,000 हून अधिक भारतीय नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. सध्याच्या अनिश्चित वातावरणापासून दूर जाण्यासाठी किंवा वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणास्तव ज्या प्रवाशांना भारतात परतायचे आहे, त्यांच्यासमोर आता मोठे संकट उभे ठाकले आहे. सध्या 'एल अल' (El Al), 'इस्राएअर' (IsraAir), 'आर्किया' (Arkia) आणि 'एअर हैफा' (Air Haifa) यांसारख्या मोजक्याच इस्रायली विमान कंपन्या सेवा देत आहेत. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचे पर्याय अत्यंत मर्यादित झाल्यामुळे उपलब्ध तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. प्रवासासाठी मोजावी लागणारी ही अतिरिक्त रक्कम इस्रायलमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांच्या बजेटबाहेर गेल्याने त्यांची कोंडी झाली आहे.