नवी दिल्ली, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारताच्या २०२४ च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. याआधी १४ जुलै २०२३ रोजी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सने आमंत्रित केले होते. भारत सरकारने २६ जानेवारी २०२४ च्या सोहळ्यासाठी आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना आमंत्रित केले होते. पण बदललेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत बायडेन यांनी भारतात येणे शक्य नसल्याचे कळवले. यानंतर भारताने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. भारत सरकारने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची ही सहावी वेळ आहे. याआधी फ्रान्सचे माजी पंतप्रधान जॅक शिराक हे १९७६ आणि १९९८ तर माजी राष्ट्राध्यक्ष व्हॅलेरी गिस्कार्ड डी एस्टिंग, निकोलस सार्कोझी आणि फ्रँकोइस ओलांदे अनुक्रमे १९८०, २००८, २०१६ मध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अमेरिका – चीन तणाव
चीनने तैवान मुख्य चिनी भूमीशी जोडण्याचा विचार जाहीरपणे बोलून दाखवला. यानंतर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली. तैवानवर चीनने हल्ला केला तर अमेरिका – चीन संघर्षाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीनच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. अमेरिकेकडून जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष आणि एअरफोर्स जनरल चार्ल्स क्यू. ब्राउन तर चीनकडून पीपल्स लिबरेशन आर्मीचे जनरल लिऊ झेनली यांनी चर्चा केली.