आर्यन खान क्रुझवरील ड्रग्जप्रकरण चांगलेच गाजले होते. मात्र आर्यन खानला ज्या कॉर्डिलिया क्रुझवरून अटक करण्यात आली होती ती कॉर्डिलिया क्रुझ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नव वर्षाच्या जल्लोषासाठी कॉर्डिलिया क्रूझ जहाजातून २ हजार प्रवाशांना गोव्याला घेऊन जाणाऱ्या या जहाजाच्या क्रू स्टाफला कोरोनाची बाधा झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कॉर्डिलिया क्रूझ जहाजावर प्रवाशांसह सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी कोरोना चाचणीमधील क्रू स्टाफला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. क्रुझवरील २ हजारहून अधिक प्रवासी आणि सर्व स्टापची तपासणी केली जात आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या क्रु स्टाफला सध्या वेगळे ठेवण्यात आले असून आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यापर्यंत कोणालाही जहाजातून उतरण्याची परवानगी नसल्याचे आदेश, अधिकाऱ्यांनी दिले आहे.
देशात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. तर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासन चिंतेत आले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. मागील आठवड्यात देशात ४१,९८० कोरोना रुग्णांची नोंद झाली तर राज्यात ११ हजार ८७७ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनासह ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटनेसुद्धा चिंता वाढवली असून देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.