येत्या नवीन वर्षात फेब्रुवारी ते मार्च दरम्यान टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. स्टार स्पोर्ट्सने अधिकृत घोषणा करत सांगितले होते की, टी-20 विश्वचषक 2026 चे संपूर्ण वेळापत्रक 25 नोव्हेंबरला म्हणजेच आज सायंकाळी 6:30 वाजता जाहीर करण्यात येईल. त्यानुसार आज आयसीसीचे अध्यक्ष जय शहा तसेच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हरमनप्रीत कौर यांच्या उपस्थितीत टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली.
दरम्यान विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. यावेळी टीम इंडिया, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिंबाब्वे, आयर्लंड, ओमान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, इटली, बांगलादेश, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, यूएई आणि कॅनडा हे 20 संघांमध्ये एकूण 55 सामने खेळवण्यात येणार असून अंतिम सामन्याचा संग्राम 8 मार्च रोजी रंगणार आहे.
स्पर्धेतील सहभागी 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. 7 फेब्रुवारीला खेळवण्यात येणारा सलामिचा सामना हा पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स या संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीला होणार आहे. विश्वचषकासाठी खेळवले जाणारे हे सामने भारतातील 5 तर श्रीलंकेतील 2 अशा 7 शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये भारतात मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबाद तर दुसरीकडे श्रीलंकेत कँडी आणि कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहेत.
https://twitter.com/ICC/status/1993322501733335226
टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेतील ज्या सामन्याची संपुर्ण भारताला उत्सुकता लागलेली असते असा हायवेटेज सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. तर टीम इंडियाचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध खेळवला जाणार आहे. 12 फेब्रुवारीला भारत विरुद्ध नामिबिया आणि 18 फेब्रुवारीला भारत विरुद्ध नेदरलँड्स असे सामने पार पडणार आहेत.
20 संघांची 4 गटात विभागणी
ए ग्रुप : टीम इंडिया, यूएसए, नामिबिया, नेदरलँड्स आणि आपाकिस्तान,
बी ग्रुप : ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिंबाब्वे आणि ओमान
सी ग्रुप : इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ आणि इटली
डी ग्रुप : न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा आणि यूएई