राज्य विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकासआघाडी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा राज्य सरकारचा प्रस्ताव परत पाठवला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत राज्यपालांनी निवडणुकीची तारीख घोषित करण्यास नकार दिला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यामुळे या अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता बारगळली आहे. तसेच राज्यपालांनी नकार कळवत प्रस्ताव परत पाठवल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मविआ विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून रखडली आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात ९ मार्च रोजी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे महाविकास आघाडी सरकारचे नियोजन होते. मात्र, त्यास राज्यपालांकडून परवानगी मिळाली नसल्यामुळे ही निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे आता पुन्हा विधानसभा अध्यक्षपदाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला. आणि राज्यपांनी पुन्हा राज्य सरकारच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवून राज्यपालांनी अध्यक्षपदाचा निवडणुकीचा प्रस्तावाला नकार कळवत परत पाठवला आहे.