ढाका: बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (Bangladesh Cricket Board) ने टी20 वर्ल्ड कपबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. बोर्डाचे अध्यक्ष अमीनुल इस्लामने स्पष्ट केले की, सध्याच्या परिस्थितीत बांग्लादेशच्या राष्ट्रीय संघाला टी20 वर्ल्ड कपसाठी भारतात पाठवण्याबाबत बोर्ड पूर्णपणे तयार नाही. याच पार्श्वभूमीवर BCB ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (International Cricket Council, ICC) औपचारिक विनंती करत काही सामने भारताबाहेर घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
अमीनुल इस्लामने सांगितले की, हा निर्णय बोर्डाच्या सर्व संचालकांसोबत झालेल्या दोन बैठकीनंतर घेण्यात आला आहे. “खेळाडूंची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आमच्या सर्व चिंता स्पष्टपणे मांडत आम्ही ICC ला पत्र पाठवले आहे. आता ICC कडून उत्तर येण्याची प्रतीक्षा आहे आणि पुढील निर्णय त्यावर अवलंबून असतील,” असे इस्लामने स्पष्ट केले.
या मुद्द्यावर भारतीय क्रिकेट बोर्डाशी (Board of Control for Cricket in India, BCCI) थेट चर्चा का होत नाही, यावरही BCB अध्यक्षाने भूमिका मांडली. “टी20 वर्ल्ड कप हा ICC चा अधिकृत कार्यक्रम आहे. त्यामुळे आम्ही थेट BCCI शी संवाद साधत नाही, तर ICC शीच संपर्कात आहोत. आमच्या चिंतांवर चर्चा करण्यासाठी ICC कडून बैठकीची अपेक्षा आहे,” असे अमीनुल इस्लामने सांगितले.
दरम्यान, या घडामोडींना अधिक वेग तेव्हा आला, जेव्हा BCCI च्या निर्देशानुसार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला IPL फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) कडून काढून टाकण्यात आले. BCCI चे सचिव देवजीत सैकिया यांनी या निर्णयामागे “सध्याच्या घडामोडी” हे कारण असावं असं स्पष्टीकरण दिले आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार, बांग्लादेश संघाला टी20 वर्ल्ड कपमध्ये कोलकात्यात तीन तर मुंबईत एक सामना खेळायचा होता. ग्रुप C मध्ये असलेल्या बांग्लादेशचा पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडीजविरुद्ध होणार होता. त्यानंतर इंग्लंड, इटली आणि नेपाळविरुद्ध सामने नियोजित आहेत.
मागील काही महिन्यांत भारत–बांग्लादेश संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा चिंता पुढे आली आहे. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तेतून पायउतार झाल्यानंतर दोन्ही देशांतील राजकीय संबंध तणावपूर्ण झाले आहेत. या राजकीय घडामोडींचा परिणाम आता खेळावरही दिसून येत असून, टी20 वर्ल्ड कपच्या आयोजनासंदर्भात ICC काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.