मुंबई: भारत दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर उद्भवलेल्या वादात माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनीही उघडपणे मत व्यक्त केले आहे. दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी गुवाहाटी कसोटीदरम्यान केलेल्या टिप्पणीवर गावसकरांनी कडक टीका केली असून ती “अर्थहीन आणि अयोग्य” असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.
गावसकरांचे मत आहे की, कॉनराड यांनी आपल्या शब्दांचा योग्य संदर्भ देत ते वक्तव्य मागे घ्यावे. बारसापारा स्टेडियमवरील दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारतावर 288 धावांची भक्कम आघाडी घेतली होती. तरीही संघाने फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. याबाबत पत्रकार परिषदेत विचारल्यावर कॉनराड म्हणाले होते, “भारताला शक्य तितका वेळ क्षेत्ररक्षणात उभं ठेवून त्यांना थकवणं हे आमचं उद्दिष्ट होतं. जेणेकरून त्यांनी आमच्यासमोर नम्र व्हावे.” या शब्दप्रयोगावर भारतीय आणि दक्षिण आफ्रिकन क्रिकेट तज्ज्ञांनीही नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा: Elections 2025 : मुंबईत मतदार यादीत मोठा घोळ! तब्बल 7 हजार मतदारांचे वॉर्ड बदलले
जिओहॉटस्टारच्या ‘क्रिकेट लाइव्ह’ कार्यक्रमात बोलताना गावसकर म्हणाले की, अशा प्रकारचे शब्द आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील परस्पर आदराला धक्का देणारे असतात. “भारत आणि बीसीसीआय यांनी दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनात अमूल्य योगदान दिलं आहे. त्यांचा पहिला पुनरागमन सामना भारतात झाला होता, हे विसरता कामा नये,” असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
गावसकर पुढे म्हणाले की, त्यांना कॉनराड यांनी माफी मागावी अशी अपेक्षा नाही. तथापि, पुढील पत्रकार परिषदेत त्यांनी या टिप्पणीमागील हेतू स्पष्ट करावा आणि शब्दांची निवड योग्य नव्हती याची कबुली द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या मते, अशा छोट्या चुका त्वरित दुरुस्त केल्या तर दोन्ही देशांतील क्रीडा संबंध अधिक मजबूत राहतील. कॉनराड यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद अजून थांबलेला नाही. क्रिकेटप्रेमी आणि माजी खेळाडू यावर आपापली मते मांडत आहेत. आता प्रशिक्षक कॉनराड पुढे यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.