Gautam Gambhir Controversy: भारतीय क्रिकेटविश्वात रोहित शर्मा, विराट कोहली आणि गौतम गंभीर ही तीन नावं नेहमी चर्चेत असतात. एकेकाळी मैदानावर एकत्र खेळलेले हे खेळाडू आता वेगवेगळ्या भूमिकांमध्ये भारतीय क्रिकेटची ओळख निर्माण करत आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडला आहे. कारण, त्याने भारतीय संघातील माजी सलामीवीर आणि सध्याचे हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर निशाणा साधत वक्तव्य केले आहे.
एका क्रिकेट कार्यक्रमात सहभागी झालेल्या आफ्रिदीने भारताच्या सध्याच्या क्रिकेट संरचनेवर भाष्य करताना रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे जबरदस्त कौतुक केले. “भारताकडे जगातील दोन सर्वोत्तम आणि अनुभवी फलंदाज आहेत. ते संघाचा कणा आहेत. ते जागतिक स्पर्धांमध्ये भारतासाठी खांदे पुढे करून लढतात,” असे तो म्हणाला.
तसंच, 2027 पर्यंत रोहित आणि विराट खेळू शकतील, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. “जेव्हा भारत कमकुवत संघांविरुद्ध सामने खेळेल, तेव्हा काही नवे चेहरे आजमावू शकतात. पण मुख्य टुर्नामेंटमध्ये या दोघांची जागा कोण घेऊ शकत नाही,” असेही तो म्हणाला.
मात्र याच संवादात त्याने गौतम गंभीरवर टीका करत वातावरण तापवले. “गंभीरने जेव्हा हेड कोचची जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्याची शैली पाहून मला वाटलं की त्याला स्वतःलाच आपले विचार सर्वोत्तम वाटतात. पण क्रिकेटमध्ये कधीच एकाच व्यक्तीचे मत अंतिम नसते. वेळोवेळी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहाव्या लागतात,” असे आफ्रिदीने टोमणा मारला.
गंभीर आणि आफ्रिदी यांच्यातील संघर्ष नवा नाही. खेळाडू असताना अनेकदा दोघे समोरासमोर आले. 2007 नंतर तर सोशल मीडियातूनही त्यांचे वैर चांगलेच गाजले आहे. त्यामुळेच आफ्रिदीचे हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे.
दरम्यान, अलीकडेच रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा नवा विक्रम केला. हा विक्रम पूर्वी आफ्रिदीच्या नावावर होता. यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, “विक्रम मोडण्यासाठीच बनतात. आणि मला आनंद आहे की हा विक्रम अशा खेळाडूने मोडला ज्याचा मी आदर करतो.”
आफ्रिदीने विराट आणि रोहितचे कौतुक करताना त्यांच्याकडून भविष्यात आणखी दमदार क्रिकेटची अपेक्षा व्यक्त केली. मात्र त्याचवेळी गंभीरबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे पुन्हा एकदा भारत-पाक माजी खेळाडूंचा जुना वाद रंगला आहे. गंभीर याकडे कसा प्रतिसाद देतात, याकडे आता भारतातील चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे.