Sanjay Manjrekar: गंभीरच्या डोक्यात चाललंय तरी काय? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर मांजरेकर संतापले

वॉशिंग्टन सुंदरवर अतिविश्वास दाखवल्यामुळे संघ संतुलन बिघडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Sanjay Manjrekar: गंभीरच्या डोक्यात चाललंय तरी काय? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर मांजरेकर संतापले

मुंबई: आयसीसी टी20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उठू लागली आहे. अहमदाबादमध्ये झालेला हा पराभव टी20 विश्वचषक इतिहासातील भारताचा सर्वात मोठा पराभव ठरला असून गतविजेत्या संघाच्या उपांत्य फेरीच्या आशांनाही मोठा धक्का बसला आहे. या सामन्यानंतर माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकर यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या संघनिवडीवर आणि रणनीतीवर कठोर टीका केली आहे.

संजय मांजरेकर यांनी विशेषतः अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरवर दाखवण्यात येणाऱ्या अतिविश्वासावर प्रश्न उपस्थित केला. भारताने 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वरच्या फळीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर सुंदरला पाचव्या क्रमांकावर बढती देण्याचा निर्णय घेतला गेला होता. उपकर्णधार अक्षर पटेलऐवजी सुंदरची निवड आधीपासूनच चर्चेत होती आणि संघ व्यवस्थापनाने तो पूर्णपणे रणनीतीचा भाग असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा: Amalaki Ekadashi 2026: आरोग्याचं 'अमृत' अन् भक्तीचा संगम; आमलकी एकादशीला आवळ्याची पूजा का करतात? वाचा

मांजरेकर यांनी उपरोधिक शैलीत प्रतिक्रिया देताना म्हटले की, पूर्वी ‘कैलास जीवन’ नावाचे एक औषध होते जे प्रत्येक समस्येवर वापरले जात असे, आणि सध्या गौतम गंभीर याच्यासाठी प्रत्येक समस्येचे उत्तर म्हणजे वॉशिंग्टन सुंदर असल्यासारखे दिसते. त्यामुळे गंभीरच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. फलंदाजीची अडचण असो किंवा गोलंदाजीची गरज, प्रत्येक ठिकाणी सुंदरलाच पुढे केले जात असल्याची टीका त्यांनी केली. सुंदरला पाचव्या क्रमांकावर पाठवल्यानंतर रिंकू सिंग आणि हार्दिक पांड्या सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणे संघ संतुलनासाठी योग्य नव्हते, असेही त्यांनी नमूद केले.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी विशेषतः संथ चेंडूंचा प्रभावी वापर करत भारतीय फलंदाजांची कमकुवत बाजू उघड केल्याचे मांजरेकर यांनी सांगितले. लुंगी एन्गिडीने विविध गतीच्या चेंडूंनी भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले. भारतीय संघ, विशेषतः कर्णधार सूर्यकुमार यादव, संथ चेंडू आणि फिरकी गोलंदाजीविरुद्ध संघर्ष करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आता भारतासमोर झिम्बाब्वेविरुद्धचा सामना ‘करो या मरो’ परिस्थितीत खेळावा लागणार आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला केवळ विजयच नव्हे तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे, कारण अहमदाबादमधील मोठ्या पराभवामुळे नेट रन रेटलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आगामी सामना भारतीय संघासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

हेही वाचा: BMC Education Budget: मुंबई महापालिका शिक्षणासाठी 4248 कोटींची तरतूद; डिजिटल क्लासरूमपासून सायबर शिक्षण, CCTV आणि आधुनिक सुविधा अशा मोठ्या घोषणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number