Rohit Sharma Retirement News: लॉर्ड्सवर रोहित शर्माचा शेवटचा सामना? निवृत्तीच्या चर्चांवर मोठी माहिती समोर

सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वालला सातत्याने संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या भवितव्याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Rohit Sharma Retirement News: लॉर्ड्सवर रोहित शर्माचा शेवटचा सामना? निवृत्तीच्या चर्चांवर मोठी माहिती समोर

भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामीवीरांपैकी एक असलेल्या रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेनंतर रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, लॉर्ड्सवर होणारा तिसरा आणि निर्णायक वनडे सामना हा भारताच्या जर्सीतील त्याचा अखेरचा सामना ठरू शकतो. मात्र, याबाबत अद्याप बीसीसीआय किंवा स्वतः रोहित शर्माने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. वृत्तांनुसार, 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय निवड समिती युवा खेळाडूंना अधिक संधी देण्याच्या तयारीत आहे. विशेषतः सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वालला सातत्याने संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या भवितव्याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या वनडेत रोहित शर्माकडून अपेक्षित मोठी खेळी पाहायला मिळाली नाही. त्याने 26 धावांचे योगदान दिले, मात्र भारतीय संघाला चार विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. या निकालामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असून आता लॉर्ड्सवर होणारा तिसरा आणि अखेरचा वनडे सामना मालिका विजेता ठरवणार आहे. अशातच रोहित शर्माच्या भविष्याबाबत विविध चर्चांना उधाण आले असले, तरी त्याच्या निवृत्तीबाबत किंवा संघातील स्थानाबाबत बीसीसीआयने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चा या माध्यमांतील वृत्तांवर आधारित असून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांवर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रोहितवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्याचे स्पष्ट करत, मोठ्या खेळाडूंना अशा चर्चांचा फारसा परिणाम होत नसल्याचे सांगितले. तसेच मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांत धावा न झाल्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

रोहित शर्माने यापूर्वी कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून सध्या तो केवळ वनडे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे लॉर्ड्सवरील सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट ठरणार का, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. 264 धावांचा वनडे विश्वविक्रम, तीन द्विशतके, अनेक संस्मरणीय खेळी आणि भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये मिळवून दिलेले यश यामुळे रोहित शर्मा भारतीय क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक म्हणून कायम स्मरणात राहील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number