मुंबई लोकलने रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मुंबईमध्ये कुठेही प्रवास आणि स्वस्तात प्रवास करायचा असेल तर लोकल प्रवासाला अधिक प्राधान्य दिले जाते. कामावर जाताना किंवा बाहेरगावी प्रवास करताना अनेकांची धावपळ बघायला मिळते. उशिर होऊ नये यासाठी बरेच प्रवासी धावती लोकल पकडतात. त्यामुळे जीवालादेखील धोका निर्माण होतो. अशातच आता धावती ट्रेन पकडणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
समोर आलेल्या माहीतीनुसार, आता जे प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतील त्यांना 2000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. धावती लोकल पकडतानाचे हे अपघात रोखण्यासाठी नवीन योजना राबवली जात आहे. आता आरपीएफ हे नवीन धोरण लागू करणार आहे.
धावत्या रेल्वेमध्ये चढू किंवा उतरु नये. प्रवाशांनी जीव धोक्यात घालून कोणतेही कृत्य करु नये, हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे आता रेल्वेतून प्रवास करताना तुम्हाला सांभाळून करावा लागणार आहे.
रेल्वे कायद्याच्या कलम 156 अंतर्गत या धोकादायक वर्तनाला गुन्हा मानण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गुन्ह्यासाठी ताकीद दिली जात होती. परंतु आता जागेवरच दंड आकारला जाणार आहे. या कृत्यांसाठी 2000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, असं एका आरपीएफ अधिकाऱ्यांनी सांगितले.