पंजाब: टी-20 क्रिकेट म्हणजे चौकार-षटकारांची आतषबाजी आणि धावांचा पाऊस, असाच काहीसा समज क्रिकेट चाहत्यांचा असतो. आयपीएल 2026 च्या चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आल्यावर अशाच एका ‘हायस्कोरिंग’ लढतीची अपेक्षा होती. मात्र, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे या सामन्याने पुन्हा एकदा सिद्ध केले. संथ खेळपट्टी आणि गोलंदाजांच्या वर्चस्वामुळे हा सामना अक्षरशः ‘काटे की टक्कर’ ठरला. अखेरच्या षटकापर्यंत ताणल्या गेलेल्या या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या लढतीत पंजाब किंग्सने बाजी मारत हंगामातील त्यांचा पहिलावहिला विजय साकारला.
नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत गुजरातला फलंदाजीसाठी पाचारण केले. गुजरातला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्याची त्यांची रणनीती होती, जी बऱ्याच अंशी यशस्वी ठरली. खेळपट्टी संथ असल्याने चेंडू थांबून बॅटवर येत होता. त्यातच मैदानाची मोठी सीमारेषा फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात गुजरातचे फलंदाज सीमारेषेवर सहज झेलबाद होत होते. परिणामी, गुजरातच्या एकाही फलंदाजाला आक्रमक आणि मोठी खेळी साकारता आली नाही.
गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकांत सहा गडी गमावून 162 धावांपर्यंत मजल मारली आणि पंजाबसमोर 163 धावांचे माफक आव्हान ठेवले. सलामीवीर साई सुदर्शन अवघ्या 13 धावांवर माघारी परतला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा स्ट्राईक रेट संघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही.
गिलने 27 चेंडूत 38, तर बटलरने 33 चेंडूत 38 धावांचे योगदान दिले. ग्लेन फिलिप्सने 17 चेंडूत 25 धावांची भर घातली, तर शाहरुख खान (4) अपयशी ठरला. राहुल तेवतिया 11 धावांवर नाबाद राहिला. पंजाबकडून विजयकुमार विशाकने भेदक मारा करत सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याला युझवेंद्र चहलची (दोन बळी) आणि मार्को यानसेनची (एक बळी) उत्तम साथ मिळाली.
163 धावांचे माफक आव्हान पंजाबचा संघ सहज गाठेल असे वाटत असतानाच सामन्याला नाट्यमय कलाटणी मिळाली. डावाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या सात धावांवर प्रियांश आर्याच्या रूपाने पंजाबला पहिला धक्का बसला. यानंतर प्रभसिमरन सिंग आणि कूपर कॉनोली यांनी संयमी फलंदाजी करत डाव सावरला. मात्र, संघाची धावसंख्या 83 असताना प्रभसिमरन बाद झाला आणि पाठोपाठ 110 धावांवर श्रेयस अय्यरही तंबूत परतला. येथूनच पंजाबच्या डावाला गळती लागली. नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस आणि मार्को यानसेन हे लागोपाठ स्वस्तात बाद झाल्याने सामना अचानक गुजरातच्या बाजूने झुकला आणि सामन्यात रंगत वाढली.
एका बाजूने फलंदाजांची रांग लागलेली असताना, कूपर कॉनोली मात्र खंबीरपणे खेळपट्टीवर उभा होता. त्याने दबावाच्या परिस्थितीत एकाकी झुंज देत नाबाद 72 धावांची मॅच-विनिंग खेळी साकारली आणि सात गड्यांच्या मोबदल्यात अखेरच्या षटकात पंजाबला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अंतिम फेरीत पराभूत झाल्यामुळे पंजाब किंग्सचे पहिल्या जेतेपदाचे स्वप्न भंगले होते. मात्र, या रोमहर्षक विजयाने जुन्या जखमा विसरून नव्या उमेदीने पंजाबने आयपीएल 2026 च्या हंगामात जोरदार आणि सकारात्मक सुरुवात केली आहे.
A memorable start for the young Australian in the @PunjabKingsIPL colors ? Cooper Connolly is adjudged the Player of the Match on his #TATAIPL debut ? Scorecard ▶️ https://t.co/75rCxTCOL1#KhelBindaas | #PBKSvGT pic.twitter.com/5JmVoTz6DW — IndianPremierLeague (@IPL) March 31, 2026