Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात इटलीच्या राजधानी रोममध्ये आहेत. या दौऱ्यात त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली असून दोन्ही नेत्यांच्या चर्चेची आणि त्यांच्या खास क्षणांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. रोममधील ऐतिहासिक कोलोसियम येथे दोन्ही नेत्यांनी भेट दिल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा ‘मोदी-मेलोनी’ केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही फोटो शेअर करत रोममध्ये पोहोचल्यानंतर मेलोनी यांच्यासोबत डिनर झाल्याची माहिती दिली. यानंतर दोघांनी कोलोसियमला भेट देत विविध विषयांवर चर्चा केली. भारत आणि इटली यांच्यातील मैत्री अधिक मजबूत करण्यावर भर देत पुढील बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचेही मोदी यांनी नमूद केले.
Upon landing in Rome, had the opportunity to meet Prime Minister Meloni over dinner followed by a visit to the iconic Colosseum. We exchanged perspectives on a wide range of subjects. Looking forward to our talks today, where we will continue the conversation on how to boost the… pic.twitter.com/df0bDYKCdU — Narendra Modi (@narendramodi) May 20, 2026
विशेष म्हणजे, दोन्ही नेत्यांचा एकत्र कारमधून प्रवास करतानाचा आणि कोलोसियम परिसरात फिरतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून भारत-इटली संबंध अधिक दृढ होत असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही पंतप्रधान मोदींचे रोममध्ये खास स्वागत केले. त्यांनी एक्सवर मोदींसोबतचा सेल्फी शेअर करत “वेलकम टू रोम, माय फ्रेंड” असा संदेश लिहिला. भारत आणि इटलीच्या ध्वजांच्या इमोजीसह केलेली ही पोस्ट काही क्षणांतच व्हायरल झाली. कोलोसियमसमोर दोन्ही नेत्यांनी काढलेला फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi meets Prime Minister of Italy, Giorgia Meloni in Rome, Italy. (Source: ANI/DD News) pic.twitter.com/ZbtaPgYNaK — ANI (@ANI) May 20, 2026
मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि इटलीमधील आर्थिक, व्यापार आणि धोरणात्मक सहकार्यावर विशेष भर दिला जाणार आहे. पंतप्रधान मोदी इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मत्तारेला यांचीही भेट घेणार आहेत. तसेच विविध राजनैतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्यानंतर ते भारतात परतणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर अर्थात IMEC प्रकल्पावरही महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून यामुळे व्यापार आणि कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार आहे. भारत आणि इटली या दोन्ही देशांनी आगामी काळात विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi, along with Prime Minister of Italy, Giorgia Meloni, visited the iconic Colosseum in Rome, Italy. (Source: ANI/DD News) pic.twitter.com/DklTlGmHSR — ANI (@ANI) May 20, 2026
याशिवाय पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) मुख्यालयालाही भेट देणार आहेत. जागतिक अन्नसुरक्षा आणि बहुपक्षीय सहकार्याच्या दृष्टीने भारताची भूमिका अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
गेल्या काही वर्षांत भारत आणि इटली यांच्यातील संबंधांमध्ये वेगाने सुधारणा होताना दिसत आहेत. दोन्ही देशांनी 2025-2029 या कालावधीसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा तयार केला असून त्याअंतर्गत संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांमध्ये सहकार्य वाढवले जाणार आहे.
रोममधील मोदी आणि मेलोनी यांच्या भेटीमुळे केवळ राजनैतिक चर्चाच नव्हे, तर सोशल मीडियावरही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कोलोसियमच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत.