यंदाच्या आयपीएल लिलावात केवळ कोट्यवधींच्या बोलीच गाजल्या नाहीत, तर संघर्षातून यशाकडे जाणारी एक हृदयस्पर्शी कहाणीही सर्वांच्या लक्षात राहिली. मंदिराबाहेर फुले विकणाऱ्या आईचा आणि क्रिकेट मैदानावर हिरवळ कापणाऱ्या वडिलांचा मुलगा, आज तोच मुलगा आयपीएलच्या झगमगत्या मंचावर पोहोचला आहे. आयुष्याच्या कठीण पिचवर खेळलेली ही इनिंग अखेर यशस्वी ठरली, आणि त्या नावाचा उच्चार झाला, 'पाथुम निसंका'.
आयपीएल 2026 च्या लिलावात श्रीलंकेच्या सलामीवीर निसंकावर दिल्ली कॅपिटल्सने चार कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. हा केवळ करार नव्हता, तर वर्षानुवर्षांच्या कष्टांची पावती होती. आज निसंकाच्या नावासमोर कोट्यवधींची रक्कम आहे, पण त्या आकड्यांच्या मागे आई-वडिलांच्या घामाचे, संयमाचे आणि न डगमगणाऱ्या विश्वासाचे मोल दडलेले आहे.
निसंकाचा प्रवास कधीच सोपा नव्हता. श्रीलंकेतील गाले येथे एका अत्यंत साध्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. वडील सुनील हे गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर ग्राऊंड्समन म्हणून काम करत. खेळाडूंनी धावा कराव्यात म्हणून पिच तयार करणारे हात, आपल्या मुलासाठी मात्र स्वप्नांचा रस्ता तयार करत होते. आई उदरनिर्वाहासाठी मंदिराबाहेर फुले विकायची. देवाच्या पायाशी फुले फुले विकून तिने आपल्या मुलासाठी आशेची प्रार्थना केली. गरिबी होती, अडचणी होत्या, पण स्वप्न सोडण्याची वेळ कधीच आली नाही.
क्रिकेटमध्ये निसंकाने मिळवलेले यश हे निव्वळ नशिबाचे नव्हे, तर मेहनतीचे फलित आहे. सध्या तो क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वनडेमध्ये 63 पेक्षा जास्त सरासरीने 694 धावा, टी-20 क्रिकेटमध्ये 18 सामन्यांत 150 च्या स्ट्राइक रेटने 625 धावा आणि त्यात एक शतक, तर ILT20 मध्ये अवघ्या 5 सामन्यांत 226 धावा. आकडे प्रभावी आहेत, पण त्याहून प्रभावी आहे त्यामागची जिद्द.
दिल्ली कॅपिटल्सला एका आक्रमक आणि विश्वासार्ह सलामीवीराची गरज होती, आणि निसंका ती भूमिका समर्थपणे बजावू शकतो. त्याच्या समावेशामुळे दिल्लीची फलंदाजी अधिक मजबूत होणार आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आयपीएलला संघर्षातून घडलेला एक प्रेरणादायी चेहरा मिळाला आहे. मंदिराबाहेर फुले विकणाऱ्या आईपासून ते आयपीएलच्या मोठ्या स्टेजपर्यंत, पाथुम निसंकाची ही कहाणी एकच संदेश देते. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी स्वप्नांवर विश्वास ठेवला आणि प्रामाणिक मेहनत केली, तर आयुष्य कधी ना कधी मोठी इनिंग खेळण्याची संधी नक्कीच देते.