T20 World Cup 2026: पाकिस्तानने पत्करली शरणागती; आयसीसीच्या दणक्यानंतर शिस्तीत वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी मोठी घडामोड घडली आहे. सुरक्षेच्या मुद्द्यावरून बांगलादेश स्पर्धेबाहेर गेला असून आयसीसीच्या दबावानंतर पाकिस्तानने अखेर आपला संघ जाहीर केला आहे.

T20 World Cup 2026: पाकिस्तानने पत्करली शरणागती; आयसीसीच्या दणक्यानंतर शिस्तीत वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर

T20 World Cup 2026: आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सुरक्षेच्या कारणावरून भारतात होणाऱ्या स्पर्धेतून बांगलादेशने माघार घेतल्यानंतर आयसीसीने कठोर भूमिका घेत थेट बांगलादेशचा सहभाग रद्द केला. या निर्णयानंतर पाकिस्तानलाही माघार घ्यावी लागली असून, अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शिस्तीत वर्ल्ड कपसाठी आपला संघ जाहीर केला आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत आपले सामने भारताऐवजी श्रीलंकेत घेण्याची मागणी केली होती. मात्र आयसीसीने खेळाडूंच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेत ही मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली. परिणामी, आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेबाहेर ठेवत त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी दिली. या निर्णयामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चेला उधाण आलं.

दरम्यान, पाकिस्तानने सुरुवातीला बांगलादेशच्या समर्थनार्थ कठोर भूमिका घेतली होती. बांगलादेश खेळणार नसेल तर आपणही स्पर्धेत सहभागी होणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा पाकिस्तानकडून देण्यात आला होता. मात्र आयसीसीने पाकिस्तानला थेट कारवाईचा इशारा दिल्यानंतर पीसीबी बॅकफुटवर गेल्याचं चित्र आहे. संभाव्य आर्थिक दंड, स्पर्धांवरील निर्बंध आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी नामुष्की लक्षात घेता अखेर पाकिस्तानने संघ जाहीर करत सहभाग निश्चित केला.

पाकिस्तानने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली असून सलमान अली आगा याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. निवड समितीने काही धक्कादायक निर्णय घेतले असून वेगवान गोलंदाज हरिस रौफ आणि माजी कर्णधार मोहम्मद रिझवान यांना संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. मात्र अनुभवी फलंदाज बाबर आझम याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे. शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान आणि नसीम शाह यांसारखे प्रमुख खेळाडू संघात कायम ठेवण्यात आले आहेत.

वर्ल्ड कप 2026 साठी पाकिस्तानचा समावेश ‘ए’ गटात करण्यात आला आहे. या गटात भारत, नेदरलँड्स, नामिबिया आणि अमेरिका यांचाही समावेश आहे. पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार असून, श्रीलंका या स्पर्धेचा सहयजमान देश आहे. पाकिस्तानचा पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे, तर 15 फेब्रुवारीला बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे.

बांगलादेशच्या अनुपस्थितीमुळे आणि पाकिस्तानच्या माघारी भूमिकेमुळे यंदाचा टी-20 वर्ल्ड कप राजकारण, सुरक्षा आणि क्रिकेट यांच्यातील गुंतागुंतीचं जिवंत उदाहरण ठरत आहे. आता मैदानात काय घडतं, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number