चीनमधून जगभरात पसरलेला कोरोना व्हायरस (Corona Virus) जगभरात थैमान घालतोय. भारतातही आता कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या येत आहेत. पुण्यात आणि मुंबईतही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. महाराष्ट्रातच कोरोनाची रुग्णसंख्या 14 च्या वर गेली आहे. मात्र अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेली कोरोनाविरोधतील घोषणाबाजी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यासंदर्भात वक्तव्य करताना आपल्या घोषणांमुळेच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण कमी असल्याचं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे.
कोरोनासंदर्भातील जनजागृतीसाठी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या प्रचारफेरीमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना, कोरोना गो…’ असा घोषणा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत चीनचे भारतातील कौन्सिल जनरल तांग गुईलाई तसंच अनेक चीनी नागरिकदेखील उपस्थित होते.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री असणाऱ्या रामदास आठवले यांची ही घोषणाबाजी social media वर व्हायरल झाली. काही नेटकऱ्यांनी यासाठी त्यांना troll केलं, memes बनवले, तर काहींनी थेट या घोषणेला आपली ring tone ही बनवली. मात्र ‘मी घोषणाबाजी केल्यानंतर महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण कमी सापडल्याचा’ दावा रामदास आठवले यांनी केलाय.
‘गो कोरोना ही घोषणा मी दिल्यामुळे महाराष्ट्रच काय, भारतातही कोरोना जास्त पसरलेला नाही. आम्ही कोरोनाला जायला सांगितलं आहे. मात्र कोरोना पसरू नये यासंदर्भात आपणही काळजी घेतली पाहिजे’, असं आवाहन आठवले यांनी केलं आहे.