ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूंना राज्य शासनाने सन्मानित केले.

ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान

मुंबई : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे हा सोहळा झाला. 

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेमधील ५० मीटर रायफल ३ पोझीशन या उपप्रकारामध्ये कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळे व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील गोळाफेक या उपप्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी या खेळाडूंचा आणि कुसळे यांच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे तसेच खिलारी यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.

राज्य शासनाने नुकत्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू व प्रशिक्षकांच्या पारितोषिकाच्या रकमेमध्ये केलेल्या भरघोस वाढीच्या पार्श्वभूमीवर पॅरिस, ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेमधील कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळे यास दोन कोटी रुपये तसेच त्यांच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना २० लाख रुपये व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी यास तीन कोटी रुपये तसेच त्यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना ३० लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

बुडापेस्ट, हंगेरी येथे १० ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पुरुष व महिला गटात अनुक्रमे १९३ व १८१ देशांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत भारताच्या संघाने सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या संघात राज्याचे बुद्धिबळपटू विदीत गुजराथी आणि दिव्या देशमुख यांचा समावेश होता. या दोन्ही खेळाडूंचा राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी रोख एक कोटी रुपये व त्यांचे मार्गदर्शक अनुक्रमे संकल्प गुप्ता आणि अभिजीत कुंटे यांना प्रत्येकी १० लाख रुपये इतकी रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विदीत गुजराथी स्पर्धेकरिता विदेशात असल्यामुळे त्यांच्यावतीने त्यांचे वडील डॉ. संतोष गुजराथी यांनी तर अभिजीत कुंटे यांच्या वतीने त्यांच्या पत्नी मेघना कुंटे आणि संकल्प गुप्ता यांच्यावतीने त्यांचे वडील  संदीप गुप्ता यांनी सन्मान स्वीकारला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number