मिझोरम: क्रिकेटच्या मैदानावरून एक अत्यंत चटका लावून जाणारी बातमी समोर आली आहे. आपल्या खेळाने चाहत्यांची मने जिंकणारा एक हरहुन्नरी खेळाडू खेळता खेळता कायमचा शांत झाला. मिझोरमचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू के. ललरेमरुआटा यांचे गुरुवारी (8 जानेवारी) सामन्यादरम्यान अचानक निधन झाले. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांनी घेतलेल्या या एक्झिटमुळे क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिझोरममध्ये सध्या स्थानिक 'सेकंड डिव्हिजन' क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. वेंगनुआई आणि चॉनपुई या संघांमधील सामन्यात ललरेमरुआटा नेहमीप्रमाणे आपल्या संघासाठी मैदानात उतरले होते. मात्र, काळाला काही वेगळेच मान्य होते. खेळ सुरू असतानाच त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला आणि काही क्षणांतच ते मैदानावर बेशुद्ध होऊन कोसळले. या अनपेक्षित घटनेने मैदानावरील खेळाडू आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला.
सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. उपचार सुरू असतानाच ललरेमरुआटा यांनी अखेरचा श्वास घेतला. एका उमद्या खेळाडूचा असा शेवट झाल्याने मिझोरम क्रिकेट असोसिएशनसह संपूर्ण भारतीय देशांतर्गत क्रिकेटवर शोककळा पसरली आहे.
मिझोरमच्या क्रीडामंत्र्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत ललरेमरुआटा यांच्या कुटुंबियांच्या प्रति संवेदना प्रकट केल्या आहेत. ललरेमरुआटा हे केवळ एक खेळाडू नव्हते, तर मिझोरम क्रिकेटचा एक महत्त्वाचा चेहरा होते. त्यांनी राज्याकडून रणजी ट्रॉफीचे दोन सामने खेळले होते, तसेच सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये सात सामन्यांत आपल्या फलंदाजीची आणि यष्टीरक्षणाची चुणूक दाखवली होती. 2019 ते 2021 या काळात त्यांनी यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संघासाठी मोलाचे योगदान दिले होते.
मैदानावर धावणारा तो उत्साह, सहकाऱ्यांना मिळणारे प्रोत्साहन आणि यष्टीमागे उभी असलेली ती चपळता आता कायमची हरवली आहे. ज्या खेळाने त्यांना ओळख दिली, त्याच खेळाच्या मैदानात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. क्रिकेटप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि जिद्द तरुण खेळाडूंसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल. एका चॅम्पियन खेळाडूला क्रीडाप्रेमींकडून साश्रू नयनांनी श्रद्धांजली वाहिली जात आहे.