Messi Social Media Post: अर्जेंटिनासाठी अखेरचा World Cup सामना? मेस्सीच्या पोस्टनंतर चर्चांना उधाण

या पोस्टनंतर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, हा त्याचा अर्जेंटिनासाठीचा अखेरचा विश्वचषक सामना ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Messi Social Media Post: अर्जेंटिनासाठी अखेरचा World Cup सामना? मेस्सीच्या पोस्टनंतर चर्चांना उधाण

२०२६ FIFA विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका भावनिक संदेशाने जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधले आहे. स्पेनविरुद्धच्या अंतिम लढतीपूर्वी मेस्सीने ट्रॉफींपेक्षा संघासोबत घालवलेला प्रवास, संघर्ष आणि सहकाऱ्यांसोबतचे नाते अधिक मौल्यवान असल्याचे सांगितले. या पोस्टनंतर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, हा त्याचा अर्जेंटिनासाठीचा अखेरचा विश्वचषक सामना ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

भावनिक पोस्टमधून व्यक्त केल्या भावना

मेस्सीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अर्जेंटिनाचा संघ आणि सपोर्ट स्टाफचा एकत्रित फोटो पोस्ट केला. त्यासोबत लिहिलेल्या संदेशात त्याने सांगितले की, या प्रवासातील खरी कमाई म्हणजे जिंकलेल्या ट्रॉफी नव्हेत, तर संघातील प्रत्येक सदस्यासोबत घालवलेले क्षण, एकमेकांवर ठेवलेला विश्वास आणि कठीण काळात मिळालेली साथ आहे.

सहकाऱ्यांचे मानले आभार

आपल्या पोस्टमध्ये मेस्सीने खेळाडू, प्रशिक्षक आणि संघासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले. त्यांच्या योगदानामुळेच अर्जेंटिनाचा संघ एका कुटुंबाप्रमाणे एकत्र राहिला आणि प्रत्येक आव्हानाला सामोरे गेला, असे त्याने नमूद केले.

 ‘निकाल काहीही असो, इतिहास आधीच घडला’

अंतिम सामन्यापूर्वी संघाचे मनोबल वाढवण्याचाही मेस्सीने प्रयत्न केला. सामन्याचा निकाल काहीही लागला तरी अर्जेंटिनाच्या या संघाने आधीच इतिहास रचला आहे. हा प्रवास आणि या संघाची कामगिरी कायम स्मरणात राहील, असे सांगत त्याने आपल्या संदेशाचा शेवट “Vamos Argentina” म्हणजेच “चला अर्जेंटिना!” अशा शब्दांत केला.

 निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण

मेस्सीच्या या भावनिक पोस्टनंतर त्याच्या निवृत्तीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अनेक चाहत्यांचे मत आहे की, FIFA World Cup 2026 चा अंतिम सामना हा मेस्सीच्या विश्वचषक कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो. काही जण तर या स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर करेल, असा अंदाज व्यक्त करत आहेत.

 भविष्यावर मौन, लक्ष मात्र अंतिम सामन्यावर

निवृत्तीच्या चर्चांदरम्यान मेस्सीने मात्र आपल्या भविष्यासंदर्भात कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्याचे संपूर्ण लक्ष अंतिम सामन्यावर असल्याचे त्याने सांगितले आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडवर मिळवलेल्या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला असून, आता स्पेनविरुद्धच्या अंतिम लढतीत अर्जेंटिना विजेतेपद पटकावणार का, याकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number