Mamta Kulkarni comeback: 90च्या दशकात आपल्या ग्लॅमर आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दीर्घ काळ सार्वजनिक आयुष्यातून दूर राहिल्यानंतर ती आता छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 25 वर्षांनंतर तिचं हे पुनरागमन असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
करिअरच्या शिखरावर असताना अचानक सिनेइंडस्ट्रीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे ममता कुलकर्णी अनेक वर्षे चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर ती अध्यात्माच्या मार्गावर वळल्याच्या बातम्या समोर आल्या. अलीकडेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिचं नाव पुन्हा गाजलं होतं. या साऱ्या घडामोडींनंतर आता ती पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात सक्रिय होत असल्याची बातमी समोर आली आहे.
ममता कुलकर्णी लोकप्रिय कुकिंग रिॲलिटी शो 'लाफ्टर शेफ अनलिमिटेड एंटरटेनमेंट'च्या तिसऱ्या पर्वात विशेष सहभाग घेणार आहे. या शोचं सूत्रसंचालन विनोदाची बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भरती सिंग करत आहेत. स्वयंपाक आणि विनोद यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमात अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी झाले आहेत.
शोच्या सेटवर ममता लाल रंगाच्या साडीमध्ये दिसली आणि तिच्या पारंपरिक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माध्यमांशी संवाद साधताना तिने दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याबद्दल आनंद व्यक्त केला. “जीवनात खूप गंभीरता वाढली आहे. कधी कधी मनमोकळं हसणंही गरजेचं असतं. इतक्या वर्षांनी पुन्हा टीव्हीवर येण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे,” असं ती म्हणाली.
या पर्वात अनेक लोकप्रिय कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.अंकिता लोखंडे, अर्जुन बिजलानी कृष्णा आणि अभिषेक यांसारखे कलाकारही या सीझनमध्ये रंगत आणणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची उत्सुकता अधिक वाढली आहे.
ममता कुलकर्णींच्या पुनरागमनाकडे केवळ एका कलाकाराच्या कमबॅक म्हणून न पाहता, ते एका नव्या प्रवासाची सुरुवात मानली जात आहे. इतक्या वर्षांच्या अंतरानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तिच्या चाहत्यांसाठी मात्र ही एक खास भेट ठरणार आहे.
एकेकाळी मोठ्या पडद्यावर झळकलेली ही अभिनेत्री आता छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचं हे नवं रूप आणि नवा अंदाज प्रेक्षकांना किती भावतो, हे लवकरच स्पष्ट होईल. मनोरंजनविश्वात ममता कुलकर्णींच्या पुनरागमनाची चर्चा सध्या रंगली असून आगामी भागाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.