जगभरातील फुटबॉलप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर भारतात साकार झाला आहे. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू Lionel Messi अखेर भारत दौऱ्यावर दाखल झाला असून, त्यांच्या आगमनाने देशभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. शनिवारी दुपारी कोलकाता येथील साल्ट लेक स्टेडियमवर अर्जेंटिनाचा फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सीच्या सत्कार समारंभात मोठा गोंधळ झाला. त्यानंतर आज रविवारी, 14 डिसेंबर रोजी मेस्सी मुंबईत येणार असून वानखेडे स्टेडियम आणि ब्राबोर्न स्टेडियममध्ये चाहत्यांशी संवाद साधणार आहे.
त्यामुळे कोलकाता येथे झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी दुपारी 12.00 ते रात्री 11.00 वाजेपर्यंत शहरातील काही भागांत वाहतूक वळवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियम परिसरात आज दिवसभर पार्किंगला पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. यात डी रोडवर एन.एस. रोडपासून ते ई आणि सी रोड जंक्शनपर्यंत वाहतूक केवळ पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे सोडली जाईल. यावेळी कोस्टल रोडवर होणारे बदल पाहायला गेलो तर दक्षिण दिशेकडील वरळी, ताडदेव ते मरीन ड्राइव्ह या मार्गांऐवजी हाजी अली जंक्शन, पेडर रोड, पंडित पलुस्कर चौक, महर्षी कर्वे रोड, चर्नी रोड, मरीन लाइन्स, अहिल्याबाई होळकर चौक, रामनाथ पोद्दार चौक हे मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हेही वाचा- Lionel Messi चं भारतात जंगी स्वागत; मुंबईतही येणार फुटबॉल आयकॉन
त्यानुसार नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावर उत्तर दिशेने जाणारा एअर इंडिया जंक्शन ते मफतलाल जंक्शन दरम्यानचा रस्ता आणि दक्षिण दिशेकडील प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते एअर इंडिया जंक्शन दरम्यानचा रस्ता बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी रामनाथ पोद्दार चौक, महर्षी कर्वे रोड, अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन), मरीन लाइन्स, चर्नी रोड, पंडित पलुस्कर चौक या मार्गांवर आवश्यकतेनुसार प्रवासासाठी मार्गे वळवण्यात येईल. कोस्टल रोडवरील उत्तर दिशेकडील मरीन ड्राइव्ह ते वरळी, ताडदेव हा मार्ग देखील आवश्यकतेनुसार बंद राहणार आहे.