आयपीएलच्या 19 व्या हंगामातील दोन सामने चांगलेच रंगले असून आता तिसरा सामना सोमवारी 30 मार्चला राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानात म्हणजेच गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या सामन्यासाठी राजस्थान रॉयल्ससह कॅप्टन कुलची टोळी देखील सज्ज झाली आहे. त्यामुळे 19 व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात पहिल्या मोसमातील अंतिम फेरीतील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. यावेळी रियान पराग राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करणार आहे. तर ऋतुराज गायकवाड सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. दरम्यान यावेळी कोण बाजी मारून पहिला सामना नावे करणार हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.
हेही वाचा- IPL 2026 MI vs KKR : 14 वर्षांचा इतिहास अखेर बदलला! रोहित-रायनची कडक ओपनिंग; MI ने घरच्या मैदानात KKR चा धुव्वा उडवला
कोण कोणापेक्षा वरचढ?
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ एकमेकाच्या तुलनेत समान बलाचे संघ आहेत. आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ एकूण 31 वेळा आमनेसामने आले आहेत. या 31 सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला 16 सामन्यांत पराभूत केलं तर राजस्थान रॉयल्सने 15 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या दोन्ही संघात काटे की टक्कर होईल असं म्हणायला काही अपवाद नाही.
हेही वाचा- IPL 2026 MI vs KKR : पहिल्याच सामन्यात चमकला MI चा लोकल बॉय; घरच्या मैदानावर ठरला मॅन ऑफ द मॅच
राजस्थानचे 'हे' 5 चेन्नईची डोकेदुखी वाढवणार
यावेळी फलंदाजीबद्दल बोलायच झालं तर राजस्थान रॉयल्स संघात असे काही फलंदाज आहेत जे चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांसाठी सर्वात मोठा धोका ठरु शकतात. यामध्ये 14 वर्षांचा तरुण वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, शिमरॉन हेटमायर, रवींद्र जडेजा आणि जोफ्रा आर्चर यांच्या समावेश आहे. आयपीएल 2025 चा कामगिरी बघता वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीमुळे चेन्नईचे गोलंदाज अडचणीत येऊ शकतात. आयपीएल 2025 मध्ये, वैभवने सात सामन्यांमध्ये 206 च्या स्ट्राइक रेटने 252 धावा केल्या होत्या, त्यामुळे यावेळेस तो कशी छाप सोडतो हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाले आतापर्यंत चेन्नईविरुद्ध 8 सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये त्याने आपली उत्तम छाप सोडली. यशस्वीने तीन अर्धशतकांसह 161 च्या स्ट्राईक रेटने 266 धावा केल्या आहेत. तसेच वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायर हा नुकत्याच पार पडलेल्या टी20 विश्वचषक 2026 पासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजच्या या फलंदाजामध्ये कोणत्याही सामन्याचे चित्र एकहाती पालटण्याची क्षमता आहे. धोनीच्या टोळीत तयार झालेला चेन्नई सुपर किंग्समधील त्याचाच साथीदार रवींद्र जडेजा आयपीएलच्या 19 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघात सामील झाला आहे. जडेजा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर असल्यामुळे जडेजा राजस्थानचा सर्वात मोठा हुकमी एक्का ठरू शकतो. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा त्याच्या वेगवान गोलंदाजीने चेन्नईच्या फलंदाजीला उद्ध्वस्त करू शकतो. राजस्थानचे हे काही खेळाडू आजच्या सामन्यात चेन्नईसाठी मोठे आव्हान उभे करू शकतात.