शनिवारी पार पडलेल्या दिल्लीच्या घरच्या मैदानावर पंजाबने दिल्लीच्या गोलंदाजांना धुतलं. इंडियन प्रीमियर लीग 2026 (IPL 2026) मध्ये शनिवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर धावांचा पाऊस पाहायला मिळाला. यावेळी दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी मैदानावर धावांचा पाऊस पाडला होता.
यावेळी केएल राहुलने अवघ्या 67 चेंडूंत नाबाद 152 धावांची ऐतिहासिक खेळी केली, तर नितीश राणाने 91 धावांचे मोलाचे योगदान दिले. या दोघांच्या फटकेबाजीमुळे दिल्लीने 2 गड्यांच्या मोबदल्यात पंजाबसमोर 264 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र पंजाब किंग्सने 4 गडी गमवून 265 धावांचं आव्हान गाठलं. विशेष म्हणजे 7 चेंडू राखून हा विजय मिळवला.
दिल्लीने दिलेल्या 265 धावांचा पाठलाग करत पंजाबकडून सलामीवीर म्हणून उतरलेल्या प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग या जोडीने पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये 116 धावा करत पावरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या आव्हानाचा अर्धा टप्पा गाठला. यावेळी प्रियांश आर्या 43 धावा करत तर प्रभसिमरन सिंग 76 धावा करत बाद झाला. त्यानंतर कूपर कोनोली 17 धावा, नेहल वढेरा 25 धावा करत तंबूत परतले. करूण नायरच्या दोन चुकांमुळे पंजाब किंग्सच्या पारड्यात गेला. करूण नायरने श्रेयस अय्यरचे दोन सोपे झेल सोडले आणि सामना फिरला.
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर केएल राहुलने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वात इतिहास रचला आहे. राहुलने केवळ 67 चेंडूंमध्ये 226.87 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 152 धावांची अविश्वसनीय खेळी साकारली. यासह आयपीएलच्या इतिहासात 150 हून अधिक धावांची वैयक्तिक खेळी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.