Hockey World Cup 2026: FIH पुरुष हॉकी विश्वचषकासाठी भारतीय हॉकी संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून 20 सदस्यांच्या चमूची निवड करण्यात आली आहे. अनुभवी खेळाडू हरमनप्रीत सिंग याच्याकडेच पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. 1975 नंतर भारताला एकदाही हॉकी विश्वचषक उंचावता आलेला नाही; शिवाय गेल्या विश्वचषकात भारतीय संघाला 9 व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे या वेळी सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.
बचाव फळी आणि गोलकीपिंगची मजबूत भिंत
विश्वचषकासाठी घोषित करण्यात आलेल्या संघात 2 गोलकीपरचा समावेश करण्यात आला असून मोहित H.S. आणि सूरज करकेरा ही जबाबदारी सांभाळतील. बचाव फळीची सूत्रे खुद्द कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या हाती असतील. त्याला साथ देण्यासाठी अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, जरमनप्रीत सिंग आणि यशदीप सिवाच या 6 बचावरक्षकांना संघात स्थान देण्यात आले आहे.
मध्यफळी अन् आक्रमक फॉरवर्ड्सची सांगड
संघाचे संतुलन राखण्यासाठी 6 मध्यफळ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, निलकांता शर्मा, विवेक सागर प्रसाद, राजिंदर सिंग आणि आदित्य अर्जुन लालागे यांचा समावेश आहे. तर गोल नोंदवण्याची मुख्य जबाबदारी 5 फॉरवर्ड खेळाडूंवर असेल. यामध्ये सर्वांच्या नजरा मनदीप सिंग आणि दिलप्रीत सिंग यांच्यावर असतील. त्यांना सुखजीत सिंग, अभिषेक आणि शिलानंद लाक्रा यांची भक्कम साथ लाभेल.
4 खेळाडूंचा पत्ता कट; 15 ऑगस्टपासून थरार रंगणार
FIH प्रो लीग खेळलेल्या 24 खेळाडूंच्या प्राथमिक संघातून अंतिम विश्वचषकासाठी 4 खेळाडूंना वगळण्यात आले आहे. यामध्ये डिफेंडर अमनदीप लाक्रा, मिडफील्डर राज कुमार पाल व रबिचंद्र सिंग मोइरांगथेम आणि फॉरवर्ड सेल्वम कार्थी यांचा समावेश आहे. विश्वचषक स्पर्धेचा बिगुल 15 ऑगस्टपासून वाजणार असून भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.