Newborns Died in Hospital Fire: तेलंगणातील आदिलाबाद येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) रुग्णालयातील नवजात शिशू विशेष काळजी विभागामध्ये (SNCU) सोमवारी रात्री 11:30 च्या सुमारास भीषण आग लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भयानक दुर्घटनेत 3 निष्पाप नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत बालकांमध्ये अवघ्या 5 दिवसांच्या चिमुकल्याचा समावेश असून, त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर दुसऱ्या एका बालकाने उपचारादरम्यान आणि तिसऱ्या बालकाने मंगळवारी सकाळी दाट धुरामुळे श्वास गुदमरून प्राण गमावले. हे मृत बालक इच्चोडा, इंद्रावेली आणि उत्नूर परिसरातील रहिवासी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
एसी युनिटच्या स्फोटाचा संशय; काचा फोडून 28 बालकांना काढले बाहेर
प्राथमिक अंदाजानुसार, वॉर्डातील एसी (AC) युनिटमध्ये अचानक स्फोट झाल्याने आग भडकली असावी, असा संशय व्यक्त केला जात असला तरी आगीचे अचूक कारण अद्याप समोर आलेले नाही. आग लागल्याबरोबर संपूर्ण वॉर्डात विषारी आणि दाट धूर पसरला, ज्यामुळे इन्क्युबेटरमध्ये असलेल्या बालकांचा श्वास कोंडू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तेथे उपस्थित पालक, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने खिडक्यांच्या काचा फोडून 28 बालकांना सुरक्षित बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले.
बालकांचे प्राण वाचवताना नर्स जखमी; 5 बालकांना तातडीने इतरत्र हलवले
आगीच्या ज्वाला आणि धुराची तमा न बाळगता बालकांचे प्राण वाचवण्यासाठी पुढे सरसावलेली परिचारिका (नर्स) आणि काही इतर कर्मचारी या बचावकार्यात भाजल्याने जखमी झाले आहेत. वॉर्डातून बाहेर काढण्यात आलेल्या 28 बालकांपैकी अनेकांना धुरामुळे श्वसनाचा गंभीर त्रास सुरू झाला आहे. तेलंगणाचे आरोग्यमंत्री दामोदर राजा नरसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी 3 गंभीर बालकांना आदिलाबादमधील खासगी रुग्णालयात आणि 2 बालकांना अधिक चांगल्या वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने निजामाबाद येथे हलवण्यात आले आहे.
हेही वाचा – Flight Emergency Landing: इंडिगो विमानाचे लंडनच्या हिथ्रो विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग; टेक ऑफनंतर काही वेळातच बिघाड
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे उच्चस्तरीय चौकशी आणि फायर ऑडिटचे आदेश
या दुर्घटनेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून संपूर्ण घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे कडक आदेश जारी केले आहेत. जखमी बालकांवर मोफत व दर्जेदार उपचार सुनिश्चित करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. याशिवाय, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे तातडीने ‘सुरक्षा आणि अग्निसुरक्षा लेखापरीक्षण’ (Fire and Safety Audit) करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
पोलीस आणि अग्निशमन दलाकडून कारणाचा सखोल तपास सुरू
सध्या पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभाग आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. शॉटसर्किटमुळे ही दुर्घटना घडली की एसी (AC) मधील तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाला, याचा सखोल तपास केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले असून, रुग्णालयातील निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.