मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे, शेतकरी उदास झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पूरबाधीत शेतकऱ्यांसाठी शासन निर्णय जारी केला. तसेच, बुधवारी पुरग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दौऱ्यावर होते. अशातच, ‘मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करत मदत दिली जाईल’, असेही आश्वासन यावेळी राज्य सरकारतर्फे देण्यात आले.
या पार्श्वभूमीवर, क्रिक्रेटपटू अजिंक्य रहाणेने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जनतेला आवाहन केले. बुधवारी सायंकाळी, अजिंक्य रहाणेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केले. ‘शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. चला, कठीण काळात त्यांच्या सोबत उभे राहूया’, असे अजिंक्य रहाणेने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे.
अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
‘नमस्कार मी अजिंक्य रहाणे. आज मी थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तो विषय आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे. म्हणजेच शेतकरी. गेले अनेक दिवस महाराष्ट्रात तसंच महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टी झालीय. त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय आणि होत आहे. हे आपण सर्वांनी वाचलं असेल आणि ऐकलं असेल. मी स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्यानं या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना किती त्रास होतो याची मला जाणीव आहे. वर्षानुवर्ष शेतकरी शेतात मेहनत करतो. आपल्याला जे काही आपल्या ताटात मिळतं, जेवायला मिळतं ते शेतकऱ्यांच्या कष्टामुळे मिळतं’, अशी प्रतिक्रिया अजिंक्य रहाणेने दिली.
पुढे, अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘सरकार आपल्या परीने मदत करत आहे. पण, मला वाटतं की आपल्या प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. आपण शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहून आपल्याला जे शक्य होईल ती मदत नक्की करावी. माझ्यापरीने, माझ्या बाजूने मी मदत करत आहे. पण, मला प्रत्येकाला हेच सांगायचे आहे, या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आपल्याकडून जी मदत करता येईल, जो पाठिंबा देता येईल तो नक्की द्यावा. कारण, यावेळी शेतकऱ्याला आपल्या सर्वांची गरज आहे’.
मी सांगितले तसे सरकार ही मदत करत आहे. पण, प्रत्येकजण शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिला तर ते चांगलं होईल. कारण शेतकरी हा आपला कणा आहे. त्याला जी मदत होईल ती द्यावी. धन्यवाद’, असे आवाहन अजिंक्य रहाणेने जनतेला दिले.