दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे जगावर नवे संकट ओढावले आहे. ओमायक्रॉन विषाणूने देशात शिरकाव केला असून महाराष्ट्रातही आज ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
गेली दीड वर्षी देशात कोरोनाने थैमान घातले. परंतु आता राज्याने जवळपास डेल्टा कोरोनावर मात केली आहे. मात्र पुन्हा एकदा देशावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे संकट ओढावले आहे. ओमायक्रॉन या नव्या विषाणूने देशात शिरकाव केला आहे. तसेच महाराष्ट्रातही ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे ओमायक्रॉनला वेळीच रोखले नाही तर मोठ्या संसर्गाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना दिला आहे.
ओमायक्रॉनला थांबविण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजना करत आहोत. मात्र टास्क फोर्ससोबत बैठक झालेली नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठास्क फोर्ससोबत बैठक घेतल्यानंतर घेण्यात येणारे निर्णय सांगणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले.
चार दिसांपूर्वी कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडले होते. त्यानंतर गुजरातमधी जामनगर येथे एक रुग्ण आढळला. तसेच महाराष्ट्रातील मुंबई येथील कल्याण-डोंबिवली येथेही ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळला. तसेच राजधानी दिल्लीमध्येही एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पाचवर पोहचली आहे, त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे आणि लसीकरण करण्याचे आवश्यक असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.