gold-Silver Rate: देशात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळत असून सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचं आवाहन केल्यानंतरही बाजारातील तेजी कायम असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात वाढत्या दरांमुळे ग्राहकांचं बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे गुंतवणूकदार मात्र वाढत्या भावामुळे समाधानी असल्याचं दिसत आहे.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावपूर्ण घडामोडींचा परिणाम आता थेट भारतीय बाजारावर होताना दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत अडथळे निर्माण झाल्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढली आहे. त्यातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या शांतता प्रस्तावाला नकार दिल्याची चर्चा समोर आल्यानंतर मध्यपूर्वेत पुन्हा संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहायला सुरुवात केली आहे.
देशांतर्गत वायदे बाजार MCX वर सोन्याच्या किमतींमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली. जुलै फ्युचर्समध्ये सोन्याचा दर १,५३,९०० रुपयांच्या पुढे गेला, तर चांदीने तब्बल २.८१ लाखांचा टप्पा पार केला. मुंबईतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी अंदाजे १.५४ लाख रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्याचवेळी एक किलो चांदीसाठी ग्राहकांना जवळपास २.७८ लाख रुपये मोजावे लागत आहेत.
गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोन्याकडे
आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता वाढली की सोन्याच्या किमतींना आधार मिळतो, असं बाजार तज्ज्ञांचं मत आहे. सध्या कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि संभाव्य महागाईमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत आहेत. त्यामुळे सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ होत आहे.
दरम्यान, वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. अनेकांनी खरेदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सराफा व्यावसायिक सांगत आहेत.
तज्ज्ञांचा इशारा काय?
बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिका-इराण तणाव कायम राहिला आणि कच्च्या तेलाचे दर आणखी वाढले, तर सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये पुढील काही दिवसांत आणखी तेजी दिसू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेबाबत ठोस निर्णय होईपर्यंत बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.