गेल्या अनेक दिवासांपासून बेपत्ता असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज अखेर ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाल्यामुळे त्यांची कसून चौकशी होणार असून देशमुखांवर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीने देशमुखांना समन्ससुद्धा बजावले होते. मात्र देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाही. देशमुखांच्या घरी, कार्यालयांवर ईडीने अनेकदा छापेही टाकले आहेत. मात्र देशमुख चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. आणि अखेर इतके दिवस बेपत्ता असलेले अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.
ईडी कार्यालयात हजर होण्यापूर्वी देशमुखांनी एक व्हिडीओ पोस्ट करत ट्विट केले. त्यांनी लिहिले की, ‘मा. उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशीसाठी संपुर्ण सहकार्य करणार आहे.’
मा. उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी साठी संपुर्ण सहकार्य करणार आहे. pic.twitter.com/c7OZ2MY1zS — ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) November 1, 2021