Forest Officer Death: एका छोट्याशा चुकीमुळे सर्वकाही संपलं; सिंहाला बेशुद्ध करण्यासाठी मारण्यात आलेलं इंजेक्शन चुकून…

गुजरातच्या जुनागढमध्ये सिंहाला पकडण्याच्या मोहिमेदरम्यान ट्रँक्विलायझर इंजेक्शनचा नेम चुकल्याने वन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला

Forest Officer Death: एका छोट्याशा चुकीमुळे सर्वकाही संपलं; सिंहाला बेशुद्ध करण्यासाठी मारण्यात आलेलं इंजेक्शन चुकून…

Forest Officer Death: गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील विसावदर तालुक्यात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या सर्वत्र चर्चेत आहे. सिंहाच्या हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या बचाव मोहिमेदरम्यान, सिंहाला बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात आलेल्या इंजेक्शनचा नेम चुकल्याने एका वन कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ऐकायला जणू एखाद्या चित्रपटातील प्रसंग वाटावा अशी असली, तरी प्रत्यक्षात ती घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

नानी मोनपारी या गावात रविवारी सकाळी मजूर कुटुंब शेतात काम करत असताना अचानक सिंहाने एका लहान मुलावर हल्ला केला. सिंहाने मुलाला जबड्यात पकडून झुडपांच्या दिशेने नेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. घटनेनंतर कुटुंबीयांनी आरडाओरड करत तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली.

हेही वाचा:Elon Musk : 'युजर दोषी आहे, Grok नाही'; भारत सरकारच्या नोटीसनंतर एलॉन मस्कने अश्लील AI कंटेट प्रकरणी हात झटकले

सूचना मिळताच वनविभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. शेत परिसर, झुडपे आणि आजूबाजूच्या भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली. काही वेळानंतर मुलगा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर खोल जखमा होत्या आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. प्राथमिक तपासात हा हल्ला सिंहानेच केल्याचं स्पष्ट झालं.

या घटनेनंतर वनविभागाने सिंहाला पकडण्यासाठी विशेष ऑपरेशन सुरू केलं. शेतात लपलेल्या सिंहाला पकडण्यासाठी ट्रँक्विलायझर गनचा वापर करण्यात येत होता. ही गन प्राण्यांना दूरवरून बेशुद्ध करण्यासाठी वापरली जाते. मात्र या मोहिमेदरम्यान घडलेला प्रसंग सर्वांनाच हादरवणारा ठरला.

सिंहाला बेशुद्ध करण्यासाठी मारण्यात आलेलं इंजेक्शन चुकून वनविभागातील कर्मचाऱ्यालाच लागलं. अशरफ चौहान असं या कर्मचाऱ्याचं नाव असून, इंजेक्शन लागल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली. सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ जुनागढच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: Rajgad Trekkers Accident : भयंकर! राजगडला ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाश्यांचा हल्ला; स्थानिकांच्या मदतीने कड्यामध्ये अडकलेली मुलं बचावली

या घटनेमुळे वनविभागावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का, मोहिमेदरम्यान योग्य समन्वय होता का, याबाबत चौकशी होण्याची शक्यता आहे. एका बाजूला निष्पाप मुलाचा बळी गेला, तर दुसऱ्या बाजूला कर्तव्य बजावत असलेल्या वन कर्मचाऱ्याने प्राण गमावले, यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागाने परिसरात गस्त वाढवली असून, सिंहाला पकडण्यासाठीची मोहीम अधिक काळजीपूर्वक राबवली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. या दुहेरी दुर्घटनेमुळे मानव आणि वन्यजीव संघर्षाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number