FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषक 2026 अखेर भारतात प्रसारित होणार; प्रसारण हक्कांचा करार अंतिम टप्प्यात

विविध भारतीय प्रसारक कंपन्यांशी झालेल्या प्रदीर्घ आणि सकारात्मक चर्चेनंतर अखेर या स्पर्धेच्या प्रक्षेपणाचा करार निश्चित झाल्याचे वृत्त आहे.

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषक 2026 अखेर भारतात प्रसारित होणार; प्रसारण हक्कांचा करार अंतिम टप्प्यात

FIFA World Cup 2026: भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. आगामी 'फिफा विश्वचषक 2026' (FIFA World Cup 2026) चे भारतात थेट प्रक्षेपण होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळी फिफाचे (FIFA) उच्चपदस्थ अधिकारी प्रसारण हक्कांबाबत (Broadcast Rights) चर्चा करण्यासाठी भारतात दाखल झाले होते. विविध भारतीय प्रसारक कंपन्यांशी झालेल्या प्रदीर्घ आणि सकारात्मक चर्चेनंतर अखेर या स्पर्धेच्या प्रक्षेपणाचा करार निश्चित झाल्याचे वृत्त आहे. या करारावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून क्रीडाप्रेमींमध्ये असलेली अनिश्चितता आता संपुष्टात आली आहे.

फिफाची नमती भूमिका; कोट्यवधी डॉलर्सच्या मागणीनंतर अखेर तडजोड
या ऐतिहासिक करारासाठी फिफा आणि भारतीय मीडिया कंपन्यांमध्ये मोठा आर्थिक पेच निर्माण झाला होता. फिफाने सुरुवातीला भारतासाठीच्या मीडिया हक्कांसाठी 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची (सुमारे 830 कोटी) प्रचंड मागणी केली होती, जी कोणत्याही भारतीय कंपनीने स्वीकारली नाही. त्यानंतर फिफाने ही रक्कम थेट 35 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत कमी केली, तरीही भारतीय कंपन्यांनी त्याला नकार दिला होता. या स्पर्धेचे बहुतांश सामने भारतीय वेळेनुसार मध्यरात्री किंवा पहाटे खेळवले जाणार असल्याने, एवढी मोठी रक्कम गुंतवून प्रायोजक (Sponsors) आणि जाहिरातदार मिळवणे कठीण जाईल, अशी भीती भारतीय कंपन्यांना वाटत होती. मात्र, नव्या तडजोडीनुसार आता हा तिढा सुटला आहे.

'प्रतीक्षा संपली, सज्ज व्हा!'; AIFF चे माजी सरचिटणीस शाजी प्रभाकरन यांचे संकेत
या संपूर्ण घडामोडींवर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (AIFF) माजी सरचिटणीस शाजी प्रभाकरन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (X) पोस्ट करत अधिकृत संकेत दिले आहेत. त्यांनी लिहिले की, "अखेर प्रतीक्षा संपली आहे! वाटाघाटी पूर्ण झाल्या असून भारतातील फिफा विश्वचषक 2026 च्या अधिकृत प्रसारण भागीदाराची घोषणा पुढील आठवड्यात अपेक्षित आहे. अनेक महिन्यांच्या अनिश्चिततेनंतर चाहते आता निश्चिंत होऊ शकतात, कारण हा विश्वचषक भारतात पूर्णपणे उपलब्ध असेल. इतिहासातील सर्वात मोठ्या फुटबॉल महाकुंभासाठी आता सज्ज व्हा!"

हेही वाचा – Virat Kohli No Handshake : सामन्यानंतर 'हात' मिळवण्यास नकार; विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेडमधील वादाने आयपीएलमध्ये खळबळ

दूरदर्शनचा नकार आणि 'झी' मीडिया ग्रुप शर्यतीत आघाडीवर
या महिन्याच्या सुरुवातीला सरकारी वाहिनी 'डीडी स्पोर्ट्स' आणि प्रसार भारतीने दिल्ली उच्च न्यायालयासमोर स्पष्ट केले होते की, ते या स्पर्धेचे मीडिया हक्क मिळवण्याच्या शर्यतीत नाहीत. प्रसार भारतीच्या या भूमिकेमुळे चाहत्यांची चिंता अधिकच वाढली होती. दरम्यान, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे (AIFF) उपमहासचिव एम. सत्यनारायण यांनी जागतिक फुटबॉलमधील भारताच्या वाढत्या व्यावसायिक महत्त्वाचा पुनरुच्चार केला आहे. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिफा विश्वचषकाचे हे महागडे मीडिया हक्क मिळवण्याच्या शर्यतीत भारतातील नामांकित 'झी' (Zee Network) समूह सर्वात आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र, अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणत्याही पक्षाने यावर अंतिम भाष्य केलेले नाही.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number