Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेवर 147 धावांनी दणदणीत विजय मिळवत ऐतिहासिक सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. निशिन येथील कोरोजी स्पोर्ट्स पार्कवर खेळल्या गेलेल्या या एकतर्फी अंतिम सामन्यात भारताने सर्वच क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केली. या विजयामुळे भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपले पहिले सुवर्णपदक निश्चित केले, तर श्रीलंकेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून कांस्यपदक पटकावले होते.
स्मृती मानधना आणि रिचा घोषची तुफानी फलंदाजी
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताच्या पूर्णपणे पचणी पडला. सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 99 धावांची भक्कम भागीदारी करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. मानधनाने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 30 चेंडूंत आपले अर्धशतक ठोकले. तिने 45 चेंडूंत 5 चौकार आणि 7 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 79 धावांची धडाकेबाज खेळी केली. शफाली वर्मा 48 धावांवर बाद झाल्याने तिचे अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकले, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 19 धावांचे योगदान दिले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या रिचा घोषने आक्रमक पवित्रा घेत संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. रिचाने अवघ्या 22 चेंडूंत नाबाद 49 धावा कुटल्या. या खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 216 धावांचा डोंगर उभारला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेची दाणादाण
जीतसाठी 217 धावांच्या बलाढ्य लक्षाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ सुरुवातीपासूनच भारतीय आक्रमणासमोर दबावाखाली आला. सलामीवीर इमेषा दुलानी 10 चेंडूंत 3 धावा करून बाद झाली, तर हसिनी परेरा खातेही न उघडता माघारी परतली. श्रीलंकेकडून कर्णधार चमारी अथापथ्थूने सर्वाधिक 29 धावा (21 चेंडू) केल्या आणि कविशा दिलहारीने 11 धावा जोडल्या. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला दुहेरी नोंदवता आली नाही.
भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर संपूर्ण श्रीलंका संघ 15.4 षटकांत अवघ्या 69 धावांवर ऑलआउट झाला. भारताकडून फिरकीपटू दीप्ती शर्माने सर्वोत्तम कामगिरी करत सर्वाधिक 3 बळी घेतले, तर श्री चरणी आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. 147 धावांच्या प्रचंड फरकाने मिळवलेला हा विजय आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील भारतीय महिला संघाचा धावांच्या फरकाने मिळालेला सर्वात मोठा विजय ठरला आहे.