वर्षभरात पडलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत. यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले असुन या महिन्यात 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
शेतकरी कर्जमाफीची आश्वासनं आणि सत्तासंघर्षाचा सर्वपक्षीय नाट्याविष्कार राज्याच्या रंगमचावर घडत असताना नोव्हेंबर महिन्यांत शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्याचं उघड झाले आहे.
ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील खरीपाच्या पीकांचे 70 टक्के नुकसान झाले. २०१५ नंतर पहिल्यांदाच शेतक-यांच्या आत्महत्यांचा आकडा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आत्महत्यांचे प्रमाण ६१ टक्क्यांनी वाढले आहे. महसूल विभागाच्या आकडेवारीनूसार ऑक्टोबरमध्ये १८६ शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या होत्या.
हा आकडा वाढून नोव्हेंबरमध्ये ३०० पर्यंत पोहोचला. मराठवाड्यात सर्वाधिक १२० शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. तर विदर्भात ११२ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.
या आकडेवारीनंतर तरी सरकार यावर कोणती भुमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.