सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी १३ जानेवारी रोजी जिल्हा बँकेच्या आरोस प्रधान कार्यालयात निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाच्या प्रांताधिकारी बंदना खरमाळे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर, मनीष दळवी, विठ्ठल देसाई या तिघांची नावे भाजपमध्ये चर्चेत आहेत. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी सतीश सावत यांचा पराभव करून शिवसेनेला धक्का देत निवडून आलेले विठ्ठल देसाई यांचे नाव अध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेवर राणे पितापुत्राने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार आणि भाजप आमने-सामने आले. दरम्यान, मतमोजणीनुसार महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला असून शिवसेना नेते आणि विद्यमान जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपाने वर्चस्व मिळवल्यानंतर आता १३ जानेवारी रोजी दुपारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार हे स्पष्ट होणार आहे.