‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जाणारा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर त्याच्या अनोख्या अंदाजामुळे नेहमी चर्चेत असतो. यावेळी त्याच्या फलंदाजीमुळे नव्हे, तर एका खास आणि अनोख्या व्हिडिओमुळे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरचं लग्न पार पडलं असून त्याच्या घरात आणखी एका सदस्याची उपस्थिती वाढली आहे.
त्याची सचिन तेंडुलकरची सून सानिया चांडोक अनेक वेळा कॅमेरासमोर तिच्या सासरच्या मंडळींसोबत दिसली आहे. यावेळी तेंडुलकर फॅमिलीने त्यांचा फॅमिली टाईम अनोख्या अंदाजाने घालवला आहे. क्रिकेटमध्ये रुळलेल्या सचिन तेंडुलकरने प्रायव्हेट जेटमध्ये देखील क्रिकेटचा सामना खेळला आहे.
त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याची मुलगी सारा तेंडुलकर सिटवर बसून फिल्डिंग करताना दिसली तर सून सानिया गोलंदाजी करताना दिसली. इतकचं नव्हे तर स्वतः क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर फलंदाजी करताना दिसला. व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर विमानाच्या केबिनजवळ हातात बॅट घेऊन फलंदाजी करताना दिसत आहे. कुटुंबातील इतर सदस्यही या क्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ शेअर करताना सचिनने एक मजेशीर कॅप्शन लिहिले आहे, “अल्टिट्युड (उंची) काहीही असो, अॅटिट्युड (क्रिकेटप्रतीची आवड) बदलला नाही पाहिजे.” काही तासांतच या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स मिळाल्या असून, तो इंटरनेटवर ट्रेंडिंगमध्ये झळकत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान सचिन तेंडुलकरचा खेळकर अंदाज आणि कुटुंबासोबत घालवलेला आनंदी क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.