चेन्नई सुपर किंग्सने पुन्हा एकदा त्यांचा चॅम्पियन अंदाज दाखवत कोलकाता नाईट रायडर्सवर 32 धावांनी दमदार विजय मिळवला. चेपॉक मैदानावर झालेल्या या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 192 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात कोलकात्याचा डाव 20 षटकांत 7 बाद 160 धावांवरच थांबला. या विजयासह चेन्नईने घरच्या मैदानावर सलग दुसरा विजय नोंदवला, तर कोलकात्याच्या वाट्याला सलग चौथा पराभव आला.
चेन्नईकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. त्याला युवा फलंदाज आयुष म्हात्रेने 17 चेंडूत 38 धावांची झंझावाती साथ दिली. डेवाल्ड ब्रेविसनेही 41 धावांचे मोलाचे योगदान दिले. सुरुवातीला चेन्नईचा डाव वेगात धावत होता, मात्र मधल्या आणि अखेरच्या षटकांत कोलकात्याच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत धावगतीवर नियंत्रण मिळवले. तरीही चेन्नईने 192 धावांचा भक्कम टप्पा गाठला.
193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात अत्यंत खराब झाली. फिन ॲलन केवळ 1 धाव काढून माघारी परतला, तर सुनील नरिनने 24 धावा केल्या. 29 धावांवरच कोलकात्याचे दोन फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी 50 धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रघुवंशी बाद झाल्यानंतर कोलकात्याचा डाव पूर्णपणे विस्कळीत झाला.
From despair in 2⃣0⃣2⃣5⃣ to redemption in 2⃣0⃣2⃣6⃣ ? A lovely comeback at Chepauk ? 5⃣-time champions #CSK win the latest episode of this classic rivalry ?#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvKKR | @ChennaiIPL pic.twitter.com/xMQteuNS6O — IndianPremierLeague (@IPL) April 14, 2026
एका टप्प्यावर केवळ 11 धावांच्या अंतरात कोलकात्याने चार महत्त्वाचे विकेट्स गमावले. रोवमन पॉवेल आणि रमणदीप सिंग यांनी 63 धावांची भागीदारी करत काहीशी झुंज दिली, पण आवश्यक धावगती वाढत गेल्याने त्यांच्यावर दबाव निर्माण झाला. शेवटी कोलकात्याला 20 षटकांत 160 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि विजय 32 धावांनी हुकला.
चेन्नईच्या गोलंदाजांनी या सामन्यात अफलातून कामगिरी केली. नूर अहमदने आपल्या फिरकीच्या जोरावर 4 षटकांत 21 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आणि कोलकात्याच्या फलंदाजीचा कणा मोडला. अंशुल कंबोजने 2 विकेट्स घेतल्या, तर खलील अहमद आणि अकील हुसेन यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळवली. चेन्नईच्या जवळपास सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट इकॉनॉमी रेट राखत कोलकात्याला संपूर्ण सामनाभर दबावाखाली ठेवले.
या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या संघात नवचैतन्य निर्माण झाले आहे. सलग दोन विजयांमुळे संघाचा आत्मविश्वास वाढला असून गुणतालिकेतही त्यांनी वरच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरत असून संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.