मुंबई: एका संलग्न कंपनीत निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून सेबीने त्यांच्या सह-संस्थापकावर कारवाई केल्यानंतर इलेक्ट्रिक कॅब सेवा प्रदात्या ब्लूस्मार्टने गुरुवारी दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू आणि मुंबईमधील त्यांच्या सेवा स्थगित केल्या. तिन्ही महानगरांमध्ये 8 हजारहून अधिक टॅक्सी पुरवणाऱ्या ब्लूस्मार्टने बुधवारी संध्याकाळी बुकिंग घेणे बंद केले आणि गुरुवारीही बुकिंग बंद राहिले. अचानक झालेल्या बंदीमुळे हजारो चालकांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तथापि, ग्राहकांनी देखील सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे.
जेनसोलची फॉरेन्सिक चौकशी करण्याचे आदेश –
दरम्यान, कंपनीने कोणतेही कारण न देता ग्राहकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, आम्ही ब्लूस्मार्ट अॅपवरील बुकिंग तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने अनमोल आणि पुनीत जग्गी या बंधूंना शेअर बाजारात बंदी घातली आणि त्यांच्या सूचीबद्ध अक्षय ऊर्जा कंपनी जेनसोलची फॉरेन्सिक चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांच्यावर इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी मिळालेल्या पैशाचा वापर आलिशान अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा – RBI ने 'या' बँकेचा परवाना केला रद्द; तुमचंही या बँकेत खाते नाही ना?
जेन्सोल ही ब्लूस्मार्टची उपकंपनी –
जेन्सोल ही ब्लूस्मार्टची उपकंपनी आहे. बुधवारी 'एक्स' वरील पोस्टमध्ये एका ग्राहकाने म्हटले आहे की, 'ब्लूस्मार्टमध्ये माझ्याकडे सुमारे 20 हजार बॅलन्स आहे आणि आज सकाळी मला ब्लूस्मार्ट सेवा निलंबित करण्यात आल्याचा ईमेल आला. हे काय आहे? जर ब्लूस्मार्ट बंद असेल तर मला परतफेड कधी मिळेल. तथापी, एका ईमेलमध्ये, ब्लूस्मार्टने ग्राहकांना 90 दिवसांच्या आत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा – ATM in Train: आता प्रवाशांना धावत्या ट्रेनमध्ये मिळणार एटीएम सुविधा!
90 दिवसांनंतर सेवा पूर्ववत झाल्या नाहीत कंपनी पैसे परत करणार –
दरम्यान, कंपनीने आणखी एका ईमेलमध्ये 'तुमच्या पाठिंब्याबद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत, असं म्हटलं आहे. आम्ही लवकरच सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु जर 90 दिवसांपूर्वी सेवा पूर्ववत झाल्या नाहीत तर आम्ही पैसे परत करण्यास सुरुवात करू. दुसऱ्या एका ग्राहकाने 'X' वर लिहिले, 'मला ब्लूस्मार्ट खूप आवडले. माझ्या खिशातील पैशांपेक्षा मला त्या ड्रायव्हर्सची जास्त काळजी वाटते जे हे प्रकरण सुटेपर्यंत बेरोजगार राहतील….'