ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. महिलांच्या 58 किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंद्याराणी देवीने दमदार कामगिरी करत कांस्यपदकावर नाव कोरले. स्पर्धेदरम्यान काही तांत्रिक अडचणी आणि अपयशी प्रयत्नांचा सामना करूनही तिने एकूण 199 किलो वजन उचलत भारतासाठी मौल्यवान पदक जिंकले.
स्पर्धेच्या सुरुवातीला बिंद्याराणीने 'स्नॅच' प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी केली. तिने अनुक्रमे 83 किलो, 85 किलो आणि 87 किलो वजन यशस्वीरित्या उचलले. या प्रकारात ती चौथ्या स्थानावर होती. मात्र पदकासाठीचा खरा संघर्ष 'क्लीन अँड जर्क' प्रकारात पाहायला मिळाला. क्लीन अँड जर्कमधील पहिल्याच प्रयत्नात बिंद्याराणीने 110 किलो वजन उचलले होते. मात्र वजन उचलताना तिचे हात तांत्रिक नियमांनुसार पूर्णपणे स्थिर न राहिल्याने पंचांनी हा प्रयत्न अवैध ठरवला. त्यानंतर दबावाखाली खेळताना तिने दुसऱ्या प्रयत्नात 112 किलो वजन यशस्वीरित्या उचलत दमदार पुनरागमन केले. अंतिम प्रयत्नात 116 किलो वजन उचलण्याचा तिचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला. तरीही तिच्या एकूण 199 किलो वजनाच्या कामगिरीमुळे कांस्यपदकावर तिचे नाव कोरले गेले.
या गटात नायजेरियाच्या राफियातू फोलाशादे लावाल हिने दिमाखदार प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या लावालने स्नॅचमध्ये 103 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 126 किलो असे एकूण 229 किलो वजन उचलले. या कामगिरीसह तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा नवा विक्रमही आपल्या नावावर केला.
कॅनडाच्या ॲन-सोफी ताशेरो हिने एकूण 215 किलो वजन (87 किलो स्नॅच + 128 किलो क्लीन अँड जर्क) उचलून रौप्यपदक जिंकले. तर इंग्लंडच्या एलिझा प्रॅटने 196 किलो (87 + 109) वजन उचलत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.विशेष म्हणजे, 2022 मधील बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 55 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकलेल्या बिंद्याराणीने यावेळी नव्या वजनी गटातही पदक जिंकत आपली सातत्यपूर्ण गुणवत्ता सिद्ध केली. बिंद्याराणीच्या या यशामुळे ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताच्या वेटलिफ्टिंगमधील पदकांची संख्या 5 वर पोहोचली असून, भारताच्या एकूण पदकसंख्येत हे 6वे पदक ठरले आहे.