BCCI Central Contract: शुभमन गिलचे होणार प्रमोशन, तर कोहली–रोहितला बीसीसीआयचा मोठा धक्का! पगारातून कट होणार 2 कोटी

बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

BCCI Central Contract: शुभमन गिलचे होणार प्रमोशन, तर कोहली–रोहितला बीसीसीआयचा मोठा धक्का! पगारातून कट होणार 2 कोटी

BCCI Central Contract: भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टबाबत मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियातील काही प्रमुख खेळाडूंच्या मानधन संरचनेत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या ग्रेडमध्ये फेरबदल होऊ शकतो, तर शुभमन गिलला मोठी बढती मिळण्याची दाट शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत ‘रोक’ जोडीनं दाखवलेल्या शानदार कामगिरीनंतर चाहत्यांना वाटलं होतं की या दोघांच्या करारात मोठ्या सवलती किंवा फायदे मिळतील. कोहलीनं सलग दोन शतके ठोकली, तिसऱ्या सामन्यात नाबाद अर्धशतक खेळले. रोहित शर्मानंही महत्त्वाची इनिंग्ज खेळून भारतीय विजयात हातभार लावला. तरीही, त्यांच्या करारात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: IPL 2026: नाशिकचे दोन खेळाडू आयपीएलमध्ये! एकाची CSKमध्ये निवड, तर दुसरा कोणत्या संघात जाणार?

यामागील मुख्य कारण म्हणजे दोन्ही ज्येष्ठ खेळाडूंनी कसोटी आणि टी-२० फॉरमॅटपासून स्वतःला दूर केले आहे. आता ते केवळ वन-डे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहेत. बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये खेळाडूंची ग्रेड ठरवताना सर्व फॉरमॅटमधील उपलब्धता आणि सातत्यपूर्ण कामगिरी यांना मोठे महत्त्व दिले जाते. त्यामुळे रोहित आणि विराट यांच्या A+ ग्रेडवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.

सध्या A+ ग्रेडमध्ये फक्त चार खेळाडूंना स्थान आहे. या श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला सात कोटी रुपये मानधन मिळते. परंतु, पुढील हंगामात या यादीत बदल होऊ शकतो. सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे शुभमन गिल. गेल्या दोन वर्षांत गिलनं सर्वच फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. कसोटी, टी-२० आणि वन-डे – तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने भारतासाठी महत्त्वाच्या इनिंग्ज खेळल्या आहेत. त्याच्या या सातत्याला योग्य तो मान देत त्याला A+ ग्रेडमध्ये बढती देण्याची शक्यता BCCI वर्तवत आहे.

याशिवाय इतर श्रेणींच्या मानधनात कोणताही बदल होत नाही. सध्या बीसीसीआयचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मानधन असे आहे:

  • ग्रेड A+ : 7 कोटी रुपये

  • ग्रेड A : 5 कोटी रुपये

  • ग्रेड B : 3 कोटी रुपये

  • ग्रेड C : 1 कोटी रुपये

कोहली आणि रोहित यांच्या ग्रेडमध्ये जर बदल झाला, तर त्यांना वर्षाला साधारण 2 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. मात्र या विषयावर अधिकृत घोषणा होईपर्यंत काहीही निश्चित नसल्याचं बोर्डाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: ICC Rankings: विराट कोहलीची मोठी झेप! रोहित शर्मासाठी आता नवे आव्हान

दरम्यान, या बातमीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. अनेक चाहत्यांनी ‘रोहित–कोहलीसारख्या मॅच विनर्सना ग्रेड घसरण?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर काहींचं मत आहे की बोर्डाने फॉरमॅट उपलब्धतेच्या आधारे निर्णय घेणं योग्य आहे. बीसीसीआयच्या पुढील सभेत या प्रस्तावांवर अंतिम शिक्कामोर्तब होईल. त्या पार्श्वभूमीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता या घोषणेकडे लागले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number