आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात करून विजेतेपद पटकावले. मात्र, सामन्यानंतरच्या ट्रॉफी वितरण समारंभात मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय संघाने आशिया कप जिंकला असला तरी संघाला अद्याप अधिकृत ट्रॉफी आणि पदके मिळालेली नाहीत. याचे कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यानी ट्रॉफी ताब्यात ठेवत भारताला न दिल्याचा गंभीर आरोप झाला आहे.
सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानातच ट्रॉफी हातात नसतानाही विजयाचा जल्लोष केला. वेळ उलटून गेल्यानंतरही भारताच्या हक्काची ट्रॉफी परत करण्यात आली नाही. हा मुद्दा थेट आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) बैठकीत पोहोचला. बैठकीत भारताने तीव्र आक्षेप नोंदवला असून अनेक सदस्य राष्ट्रांनी देखील नक्वीच्या भूमिकेचा निषेध केला. तरीही नक्वी त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आहे.
बीसीसीआयने या प्रकरणावर कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मोहसिन नक्वीला ट्रॉफी परत करण्यासाठी 72 तासांची मुदत देण्यात आली आहे. या दिलेल्या कालावधीत त्यांनी ट्रॉफी एसीसी कार्यालयात न दिल्यास, त्याच्या विरोधात दुबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली जाणार आहे. जर गुन्हा नोंदवला गेला, तर त्याला अटक होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
भारताच्या विजयावर असे गडद सावट निर्माण होणे हे चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. क्रिकेटप्रेमी आता उत्सुकतेने पाहत आहेत की नक्वी पुढे काय भूमिका घेतोय. ट्रॉफी भारताकडे कधी येते आणि या वादाचा शेवट कसा होतोय हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
एकंदरीत, आशिया कपचे विजेतेपद जिंकूनही ट्रॉफीच्या ताब्यासाठी संघर्ष करावा लागणे ही भारतीय संघासाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी अनपेक्षित घटना ठरली आहे.