भारताची सरकारी विमान कंपनी एअर इंडिया आजपासून टाटा समूह आपली सेवा सुरू करणार आहे. एअर इंडियाचे संचलन टाटा समूह करणार असून लवकरच इतर औपचारिक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तसेच गुरुवारपासून एअर इंडिया टाटा कंपनीने आखलेल्या योजनेनुसार उड्डाणे भरणार आहे.
केंद्र सरकारने एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर केंद्र सरकारने ८ ऑक्टोबर २०२१ रोजी, १८ हजार कोटी रुपयांमध्ये टाटा समूहाच्या ‘टॅलेस प्राइव्हेट लिमिटेड कंपनी’ला एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. तर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली असून गुरुवारपासून टाटा समूह एअर इंडियामध्ये आपली सेवा सुरू करणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया कंपनी कर्जात बुडाली असल्यामुळे सरकार ही कंपनी विकण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर अखेर ६९ वर्षांनी एअर इंडिया टाटा समुहाची होणार असून गुरुवारपासून टाटा समूह एअर इंडिया उडवणार आहे.