क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे कधी काय होईल कोणीच सांगू शकत नाही. नेहमी दुबळे समजले जाणारे संघ ही कधी बलाढ्य संघांना पराभवाची धुळ चारतील हे सांगण अशक्य असते. असाच काहीसा प्रकार टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेत घडलेला पाहायला मिळाला आहे. झिम्बॉब्वे विरुद्ध आयरलँड यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाल्यानं ऑस्ट्रेलिया टी 20 विश्वचषकातून बाहेर गेला आहे. केन्डीच्या पॅलकेल्लीमध्ये खेळवला जात असलेला झिम्बॉब्वे विरुद्ध आयरलँड यांच्या सामन्यादरम्यान सकाळपासूनच पाऊस सुरू होता ज्यामुळे मॅचमध्ये एकही बॉल टाकला गेला नाही.
एकीकडे आयर्लंडच्या विजयासाठी प्रार्थना करत असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे स्वप्न पावसाने धुवून काढल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रुप बी मध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियाचा यंदाच्या वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्ध पराभव झाला होता, ज्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी सुपर-8 मध्ये कायम कायम राहण्यासाठी आयर्लंडविरुद्ध झिम्बाब्वेचा पराभव होणं गरजेचं होतं. मात्र झिम्बॉब्वे आणि आयरलँड यांना सामना रद्द झाल्यानं दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आले.
झिम्बाब्वेने ग्रुप स्टेजमध्ये 3 पैकी 2 सामने जिंकले तर त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला, ज्यामुळे झिम्बॉब्बेचे ब गटात 5 गुण झाल्यानंतर झिम्बॉब्वे देखील सुपर 8 मध्ये पोहोचलं आहे. झिम्बाब्वेचा आयर्लंडविरुद्ध पराभव झाला असता आणि ऑस्ट्रेलियाने ओमानला मोठ्या फरकाने हरवलं असतं, तर ऑस्ट्रेलिया सुपर-8 मध्ये पोहोचले असते. ऑस्ट्रेलियाने ओमानविरुद्ध कितीही मोठा विजय मिळवला तरी त्या सामन्याला आता अर्थ उरणार नाही. कारण या सामन्यातून त्यांचे जास्तीत जास्त 4 पॉईंट्स होतील, दुसरीकडे झिम्बाब्वेचे आधीच 5 पॉईंट्स झाल्यामुळे ते सुपर-8 मध्ये पोहचले आहेत. टी20 वर्ल्ड कप इतिहासात झिम्बॉब्वे पहिल्यांदा सुपर 8 मध्ये पोहोचलं आहे. तसेच यापूर्वी 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ टी 20 वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत बाद झाला होता.