भारतात वाघ वाचविण्यासाठी गांभीर्यपूर्ण प्रयत्न होत आहेत. परंतु मागील नऊ वर्षात देशात एकूण वाघांच्या मृत्यूंपैकी ३५ टक्के मृत्यू हे शिकारीने झाल्याची माहिती समोर आली आहे.
या कालावधीत देशातील ८५७ वाघ मृत्युमुखी पडले असून त्यापैकी ३०१ वाघांचा मृत्यू शिकारीमुळे झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, चालू वर्षात आतापर्यंत ७८ वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झालेला आहे. सर्वाधिक व्याघ्र मृत्यू झालेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश पहिल्या स्थानी असून तेथे २०२ वाघांचे मृत्यू झाले आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून राज्यात १४१ वाघांचे बळी गेले आहेत, तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर असून तेथे १२३ वाघांचे बळी गेले आहेत.
२०१२ ते २०२० या कालावधीत झालेल्या बहुतांश वाघांच्या मृत्यूंचा छडा लागला असून केवळ ९५ प्रकरणांचा म्हणजेच ११.९ टक्के प्रकरणांचा छडा लागणे बाकी आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार
वर्ष शिकार एकूण मृत्यू
२०१२ २३ ८८
२०१३ २९ ६८
२०१४ १३ ७९
२०१५ १२ ८२
२०१६ २५ १२१
२०१७ ३३ ११६
२०१८ ३४ १०२
२०१९ १७ ९५
२०२० ०७ १०५